DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – ‘सुकर जीवनमान’ (इझ ऑफ लिव्हिंग) संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तत्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने कल्याण आणि भांडुप परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी अशा विविध वर्गवारीतील २ लाख ७३ हजारांहून अधिक ग्राहकांना गेल्या आर्थिक वर्षात नवीन वीजजोडणी देण्यात आली.
नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ‘इझ ऑफ लिव्हिंग’ संकल्पना आणली आहे. वीज ही आज मुलभूत गरज बनलेली असल्याने अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठ्याचा समावेश या संकल्पनेत करण्यात आलेला आहे. त्यानुसार कल्याण व भांडुप परिमंडलामध्ये महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिलेले निर्देश आणि वीज नियामक आयोगाने निर्धारीत केलेल्या कृती मानकांनुसार विहित कालावधीत नवीन वीजजोडणी देणे, अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासह ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात आला आहे.
कल्याण परिमंडलात २०२४-२५ या आर्थिक वर्षात विविध वर्गवारीतील सिंगल फेजचे १ लाख ३८ हजार ५७० आणि थ्री फेजचे ११ हजार ९०१ असे एकूण १ लाख ५० हजार ४७१ नवीन ग्राहक महावितरणने जोडले आहेत. यात कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ३१ हजार ९०५, कल्याण मंडल दोन कार्यालयांतर्गत ३९ हजार २३९, वसई मंडलांतर्गत सर्वाधिक ५३ हजार ७१० आणि पालघर मंडलातील २५ हजार ६१७ नवीन वीज जोडण्यांचा समावेश आहे.
भांडुप परिमंडलात गत आर्थिक वर्षात विविध वर्गवारीतील सिंगल फेजच्या १ लाख ३ हजार ९२५ आणि थ्री फेजच्या १९ हजार ११ अशा एकूण १ लाख २२ हजार ९३६ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यात वाशी मंडल कार्यालयांतर्गत सर्वाधिक ५२ हजार ४७२, ठाणे शहर मंडलांतर्गत ३३ हजार ६५७ आणि पेण मंडल कार्यालयांतर्गत ३६ हजार ८०७ नवीन वीज जोडण्यांचा समावेश आहे.
—