DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पुर्वेतील 5/ड प्रभागानजीक उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचा लोकार्पण सोहळा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे दि.13 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. या लोकार्पण सोहळ्याच्या पूर्व तयारीच्या कामांची आढावा बैठक महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात आज सकाळी संपन्न झाली, त्यावेळी आयुक्तांनी कार्यक्रम स्थळी सुरु असलेल्या आणि झालेल्या तयारीची माहिती उपस्थित अधिकारी वर्गाकडून घेतली.
ज्ञान केंद्र परिसर, लोकार्पणानंतर दि. 14 तारखेला देखील सकाळ पासून खुले राहणार असल्याने, सदर ठिकाणी होणाऱ्या गर्दीचे पोलीसांच्या मदतीने नीट नियोजन करावे, ज्ञान केंद्राच्या मार्गावर दिशा दर्शक फलक लावावा. ज्ञान केंद्राचे काम पूर्ण झाले आहे याची शहानिशा करावी. दि. 13 एप्रिल रोजी सायंकाळ पासून कार्यक्रम स्थळी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक तैनात ठेवावे. जनरेटर व विद्युत व्यवस्था चोख ठेवावी. अग्निशमन दलाने देखील आपल्या गाड्या पूर्व तयारीनिशी सज्ज ठेवाव्यात, अशा सुचना आयुक्तांनी यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या संबंधित अधिकारी वर्गास दिल्या.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त-1 हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त-2 योगेश गोडसे, इतर संबंधित अधिकारी वर्ग, पोलीस अधिकारी, जयंती उत्सव समितीचे सुमेध हुमणे उपस्थित होते.