DESK MARATHI NEWS.
भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडी ग्रामीण भागातील तालुका पोलीस ठाण्यात खऱ्या गुन्ह्यांऐवजी खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असून खऱ्या गुन्ह्यांमध्ये टाळाटाळ होत असल्याचा आरोप भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केला आहे.सोमवारी खासदार बाळ्या मामा यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तालुका पोलिसांना चांगलेच धारेवर धरून खडसावले.
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खार्डी गावातील एका तरुणाला मारहाण झाल्यानंतर सदर तरुण मारेकऱ्यांच्या भीतीने तक्रार दाखल करण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी गेला होता.मात्र या मारहाण झालेल्या तरुणाला तालुका पोलिसांनी तीन तासाहून अधिक काळ गुन्हा नोंद न करता ताटकळत ठेवले होते. या संपूर्ण प्रकरणाची माहिती खासदार बाळ्या मामा यांना मिळताच खासदार बाळ्या मामा यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तालुका पोलीसांना चांगलेच धारेवर धरले.
तालुका पोलिसांनी मागील अनेक खऱ्या प्रकरणांमध्ये फिर्यादीची बाजू ऐकून न घेता गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब करत असून काही दाखल गुन्ह्यांमध्ये तालुका पोलीस फिर्यादी ऐवजी आरोपींची बाजू उचलून धरत असल्याने अनेक प्रकरणांमध्ये फिर्यादींनी आरोपींना घाबरून स्वतःच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपले दाखल गुन्हे मागे घेतल्याची अनेक प्रकरणे आपल्या समोर आली आहेत.वेळ आल्यास हि प्रकरणे पुराव्यांनिशी आपण समोर आणू शकतो असा दावा देखील खासदार बाळ्या मामा यांनी यावेळी केला आहे.
कोणत्या राजकीय दबावापोटी तालुका पोलीस खोटे गुन्हे त्वरित दाखल करतात.मात्र खऱ्या गुन्ह्यांमध्ये नागरिकांना वेठीस धरून त्यांच्याकडून पुराव्यांची मागणी करत फिर्यादींना ताटकळत ठेवतात.तालुका पोलिसांची हि कृती दुर्दैवी असून यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असुन तालुका पोलोसांनी वेळीच या बाबीची गंभीर दखल घेतली नाही तर आपण तालुका पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन करू असा इशारा यावेळी खासदार बाळ्या मामा यांनी दिला आहे.