DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 7 प्रभागांसाठी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रारंभ झालेल्या सुमित एल्कोप्लास्ट या खासगी संस्थेच्या स्वच्छता उपक्रमाचे सकारात्मक दृष्य परिणाम दिसू लागले आहेत. महापालिका प्रशासनाकडून या सातपैकी ड, जे आणि फ या 3 प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित 4 प्रभागांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या तिन्ही प्रभाग क्षेत्रात राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेंतर्गत (इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग – itac) तब्बल 1 हजार 300 टनांहून अधिक कचरा संकलन करण्यात आले आहे.
चेन्नई शहरातील स्वच्छता पॅटर्नच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 10 पैकी 7 प्रभागांतील कचरा संकलन आणि वाहतूकीचे काम सुमित एल्कोप्लास्ट या खासगी संस्थेला देण्यात आले आहे. महापालिकेच्या अ, ब आणि क वगळता उर्वरित 7 प्रभाग क्षेत्रामध्ये हे स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. आजच्या तारखेपर्यंत 7 पैकी ड, जे आणि फ या तिन्ही प्रभागांत पूर्ण क्षमतेने कचरा संकलन आणि वाहतूकीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर उर्वरित 4 प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून ऑगस्ट अखेरपर्यंत ती पूर्ण होईल असा विश्वास अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
सध्याच्या घडीला या तिन्ही प्रभागांमध्ये दररोज सकाळी 6 ते 2, दुपारी 2 ते 10 आणि रात्री 10 ते सकाळी 6 अशा वेळापत्रकानुसार कचरा संकलनाचे काम केले जात आहे. तसेच लोकांना या वेळा माहिती होण्यासाठी, कचऱ्याचे ओला आणि सुका वर्गीकरणाबाबत जागृती करण्यासाठी, सुमित एल्कोप्लास्टमार्फत आयइसी (इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन) टीम घरोघरी भेट देत आहे. तसेच कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांवरही स्पीकर यंत्रणा लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
या प्रभागांतील काही ठिकाणी पूर्ण स्वच्छता करूनही त्यानंतर लोकांकडून सतत कचरा टाकण्यात येत असून अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कॉम्पॅक्टर कंटेनर ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून मोकळ्या जागेमध्ये पडणारा कचरा त्या कॉम्पॅक्टर कंटेनरमध्ये जाईल. आणि परिसर स्वच्छ राहण्यासह हा कचरा उचलणेही सोयीस्कर ठरेल असेही अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच काही अपवाद वगळता ड, जे आणि फ प्रभागांमध्ये सुरू असलेल्या या स्वच्छता उपक्रमाला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याने कचरामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
तर उर्वरित ग आणि ह प्रभागाचे या महिन्याअखेरपर्यंत आणि उरलेले आय – जे प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया ऑगस्ट अखेरीपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यानंतर या सातही प्रभागांमध्ये अतिशय परिणामकारकपणे स्वच्छता दिसून येईल. तसेच या सात प्रभागांतील सफाई कर्मचारी – यंत्रणा ही अ, ब आणि क प्रभागांसाठी उपलब्ध होणार असल्याने या प्रभागांतही आणखी चांगली स्वच्छता राखली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
विशेष स्वच्छता मोहीमेंतर्गत झालेले कचरा संकलन :-
5/ड प्रभाग (19 मे ते 2 जून) :-
कचऱ्याची ठिकाणे – 100
कचरा संकलन – 436 टन
मनुष्यबळ – 50-55 सफाई कर्मचारी
वाहनांची संख्या – लहान मोठ्या मिळून 7-8 वाहने
4/जे प्रभाग (24 मे ते 22 जून) :-
कचऱ्याची ठिकाणे – 80 पेक्षा जास्त
कचरा संकलन – 817 टन
मनुष्यबळ – 35- 40 सफाई कर्मचारी
वाहनांच्या संख्या 8- 9 गाड्या
6/फ प्रभाग (24 जून ते 3 जुलै) :-
कचऱ्याची ठिकाणे – 33
कचरा संकलन – 70 टन
मनुष्यबळ – 12 ते 15 कर्मचारी
वाहन संख्या – 3-4