नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी एक चैन चोरणाऱ्या टोळीला पकडले आहे. एक बाईक चालवायचा, तर दुसरा त्याच्या मागे बसून चैन चोरायचा. धक्कादायक म्हणजे जो बाईकवर मागे बसायचा तो पायाने अपंग आहे. या दोघांनी मिळून आत्तापर्यंत पाच शहरात चोरी केल्याचे उघड झाले आहे.
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विजय सेलच्या समोर एक चैन चोरीची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने, पोलीस अधिकारी अविनाश वनवे, प्रशांत आंधळे, संपत फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीपर्यंत पोहचले. रायगड येथील मानगाव परिसरातून दोन चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. या मध्ये सुखवीर रावल आणि विरु राजपूत अशी या चोरट्यांची नावे आहे. धक्कादायक म्हणजे सुखवीर रावल हा पायाने अपंग आहे. तो बाईकवर मागे बसतो. विरु हा बाईक चालवायाचा. संधी मिळताच सुखवीर हा नागरीकांच्या अंगावरील दागिने हिसकवायचा.त्यानंतर दोघेही बाईकवरुन पसार होत होते.
या दोघांनी पाच शहरात धुमाकुळ घातला होता. त्यांच्याकडून पोलिसांनी साडे सात लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एकीकडे समाजाकडून अपंग असलेल्या व्यक्तीविषयी सहानुभूती दाखविली जाते. मात्र, त्याच अपंग व्यक्तीकडून अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे केले जात असल्याचे या घटनेतून उघड झाली आहे.