DESK MARATHI NEWS.
मुंबई/प्रतिनिधी – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आणि दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.
“जनतेला केंद्र सरकारला सांगावं लागतंय की काहीतरी कारवाई करा. अनेक हल्ले झाले, अनेकजण दगावले पण, दहशतवाद काही थांबत नाही. केवळ श्रद्धांजली पुरेशी नाही, केंद्र सरकारने प्रत्यक्ष कृती केली पाहिजे,” असे आंबेडकर म्हणाले.
त्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पंतप्रधानांनी तिन्ही लष्करप्रमुखांना बोलावून चर्चा केली, मात्र भाजप पक्ष स्तरावर किंवा केंद्र सरकारने कॅबिनेट स्तरावर कोणतीही बैठक घेतली नाही. वर्तमानपत्रांतून केवळ एवढेच समजले की, लष्कराला ‘हवी तशी कारवाई करा’ असे सांगण्यात आले. पण, कोणतीही कारवाई ठराविक प्रक्रिया आणि निर्णयातूनच होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आंबेडकरांनी ऐतिहासिक संदर्भ देत इंदिरा गांधींच्या १९७१च्या निर्णयाची आठवण करून दिली. “ जेव्हा चार कोटी निर्वासित बांगलादेशी भारतात आले, तेव्हा भारताचे गोडाऊन रिकामे झाले. इंदिरा गांधींनी जगासमोर ही स्थिती मांडली. अखेर जगाने ठामपणे सांगितले की, हा प्रश्न सोडवा. त्यातूनच बांगलादेश निर्माण झाला. ही संधी त्यांनी ओळखली. आज अशीच ऐतिहासिक संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आहे,” असे ते म्हणाले.
“जर युद्ध खर्चिक बाब आहे, असे सरकार म्हणत असेल, तर आम्ही विचारतो की, तुम्ही ६३ हजार कोटींचे राफेल घेतले, जी २०३० ला येणार आहेत. त्याऐवजी तो पैसा आजच्या कारवाईसाठी वापरावा. लोकं सरकारसोबत उभे राहतील. सरकारने एक पाऊल टाकावे, लोकं दोन पाऊल टाकतील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“जग पाकिस्तानकडे एक आतंकवादी देश म्हणून पाहत आहे. आज निर्णय घेऊन मोदींनी इतिहासात आपले नाव अजरामर करण्याची संधी साधावी. लष्कर सज्ज आहे पण, निर्णय घेणारी कॅबिनेटची मानसिकता तयार होणे आवश्यक आहे,” असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांना स्पष्ट संदेश दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, ऍड. प्रियदर्शी तेलंग, डॉ. नितीन ढेपे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, फारुख अहमद, दिशा शेख, युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, सर्वजित बनसोडे, सविता मुंडे, सिद्धार्थ मोकळे, माजी आमदार कपिल पाटील, युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.