नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – ३ ते १२ जानेवारी दरम्यान “नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनात शाळांची भूमिका” या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हे प्रशिक्षण सीसीआरटी मार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनइपी २०२० च्या पार्श्वभूमीवर आयोजित केले गेले.
या प्रशिक्षणासाठी संपूर्ण देशातून सुमारे ८० शिक्षकांची निवड करण्यात आली. कल्याण तालुक्यातील टिटवाळा नजीकच्या जिल्हा परिषद शाळा सांगोडे येथे कार्यरत असलेल्या माधुरी राजेंद्रसिंग चव्हाण (ठाकूर) यांची ही निवड ठाणे जि प मार्फत महाराष्ट्र राज्यातून करण्यात आली. मराठी शाळेतील शिक्षिकेला राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करायला मिळणे ही कौतुकास्पद बाब आहे.
सीसीआरटी प्रशिक्षणा संदर्भात माहिती देताना त्या म्हणाल्या की, सेंटर फॉर कल्चर रिसोर्सेस मार्फत हे प्रशिक्षण दिल्ली, हैदराबाद, उदयपूर आणि गुवाहाटी येथे ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्षरीत्या होत असते. संपूर्ण देशभरातून निवडलेल्या शिक्षकांना आपल्या राज्यातील संस्कृतीची देवाण-घेवाण करता यावी, तसेच आपल्या नैसर्गिक व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना सहजसोप्या पद्धतीतून या ऐतिहासिक वारसा यांच्या संवर्धनासाठी प्रेरित करणे हे या प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असते.
परंतु कोविडमुळे गेली दोन वर्षे हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने होत असले तरीही आम्हा सर्व शिक्षकांना एकाच जागी संपूर्ण भारत भूमीचे सांस्कृतिक ऐतिहासिक तसेच नैसर्गिक दर्शन घडले. महाराष्ट्रात ऊन व थंडी असताना काश्मीरमधून चक्क स्नोफॉल पाहायला मिळाला. या दहा दिवसातील प्रशिक्षणादरम्यान आपापल्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींकडून अमूल्य ज्ञान प्राप्त झाले. आम्हीही ग्रुप रिसर्च लेसन प्लान्स, स्टेट प्रेझेंटेशन मार्फत सहभाग नोंदवला. येणाऱ्या काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याचा नक्कीच उपयोग होईल. यापुढे ही आमची टीम अधिक प्रकर्षाने व उत्साहाने भारत भूमीच्या नैसर्गिक व सांस्कृतिक वर्षांचे संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया माधुरी चव्हाण यांनी दिली.



