DESK MARATHI NEWS.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – डॉ.बाबासाहेबांची विचारधारा जनमानसात पोहचविण्यासाठी कल्याणमधील ज्ञान केंद्राप्रमाणेच राज्यात सर्वत्र ज्ञान केंद्रे उभारणार, असे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री मा.ना.उदय सामंत यांनी काल रात्री संपन्न झालेल्या कल्याण पूर्वेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राच्या शानदार लोकार्पण समयी केले. मा.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेल्या या ज्ञान केंद्राच्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत समग्र माहिती पोहचविण्याचे काम केले आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या ज्ञान केंद्रांची प्रतिकृती सर्वत्र होणे गरजेचे आहे, असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री मा.ना.उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री मा.ना.संजय शिरसाठ यांच्या हस्ते व मा.आमदार राजेश मोरे, सुलभाताई गायकवाड, इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
इतके सुंदर ज्ञान केंद्र पाहून आजचा दिवस कारणी लागला अशा भावना सामाजिक न्याय मंत्री मा.ना.संजय शिरसाठ यांनी या कार्यक्रमात व्यक्त केल्या. ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी इच्छा शक्ती लागते. या इच्छा शक्तीतूनच हे ज्ञान केंद्र उभारले गेले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी ज्ञान केंद्रे आपण तयार करु, तसेच तळागाळातील मुलांसाठी 125 हॉस्टेल्स आपण महाराष्ट्रात तयार करीत आहोत यामध्ये सुमारे 25000 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री मा.ना.संजय शिरसाठ यांनी देखील यावेळी दिली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला संघर्ष, त्यांची जीवनगाथा interactive पध्दतीने सर्वांपर्यंत पोहचावी या दृष्टीकोनातून हे ज्ञान केंद्र साकारण्यात आले आहे, अशी माहिती मा.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलताना दिली. आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे आज लोकार्पणाचा कार्यक्रम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिना पूर्वी संपन्न झाला, ही एक अभिमानाची बाब आहे, असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी मा.आमदार सुलभाताई गायकवाड तसेच अण्णासाहेब रोकडे ,निलेश शिंदे यांची देखील समायोचीत भाषणे झाली.
या स्मारकासाठी रुपये 16.70 कोटी इतका खर्च झाला असून, शासनाच्या महापालिका क्षेत्रातील मुलभूत सोयीसुविधांचा विकास या लेखाशिर्षका अंतर्गत रुपये 9 कोटी मंजूर व प्राप्त झाले असून, उर्वरित खर्च महापालिकेने केला आहे आणि आता हे ज्ञान केंद्र दि. 14 एप्रिल पासून लोकांसाठी खुले करीत आहोत, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.
यासमयी शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे कार्याध्यक्ष महेश गायकवाड, महापालिकेचे माजी पदाधिकारी, माजी पालिका सदस्य , महापालिका अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे ,इतर अधिकारी /कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.