DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पूर्वेत राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधम आरोपी विशाल गवळी याने आज तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. त्यावेळी या क्रूर घटनेत या आरोपीला अटक करण्यात आली तेव्हा सर्वच स्तरातून फाशीची शिक्षा त्याला द्यावी अशी मागणी होत होती. आज त्याच्या आत्महतेच्या घटनेने नैसर्गिक न्याय झाल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
कल्याण पूर्वेत राहणारी अल्पवयीन मुलगी सोमवारी संध्याकाळी चार वाजता काही कामानिमित्त घरातून बाहेर पडली होती. कोळसेवाडी भागात राहणाऱ्या विशाल गवळीची या अल्पवयीन मुलीवर नजर पडली. त्यांनी तिला फूस लावून स्वताच्या घरी आणले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून राहत्या घरातच तिची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीला आले होते.
हे सर्व प्रकरण आरोपीच्या पत्नीला देखील माहीत होते तरीही तीने त्याला साथ दिली.विशाल गवळीची पत्नी साक्षीने घरात घडलेला सर्व घटनाक्रम पोलिसांनी केलेल्या चौकशीत कथन केला. विशाल गवळी कल्याण पूर्वेत कोळसेवाडी भागात राहतो. विशालने संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मुलीला फूस लावून आपल्या घरी आणले. तिच्यावर अत्याचार केले. या मुलीने आपण केलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला तर आपण पकडले जाऊ या भीतीने विशालने तिची हत्या केली. मुलीची हत्या केल्यानंतर विशालने तिचा मृतदेह घरातील एका बॅगेत भरून ठेवला. मुलीची हत्या केल्यानंतर विशाल घरात थांबून होता.विशालची पत्नी साक्षी बँकेत नोकरी करत होती. ती संध्याकाळी सात वाजता घरी आली.तेव्हा विशालने तिला घरात आपण केलेली अघोरी घटना सांगितली.
या प्रकाराला विरोध करण्याएवेजी तीने पतीला साथ दिली,विशालने पत्नी साक्षीच्या साहाय्याने रात्रीच्या वेळेत घरातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. घरात पडलेले रक्त दोघांनी साफ केले. तोपर्यंत रात्रीचे साठे आठ वाजले होते. विशालने आपला मित्र असलेल्या रिक्षा चालकाला घरी बोलवले. मृतदेह असलेली बॅग रिक्षेत ठेवण्यात आली. पत्रीपूल मार्ग आधारवाडी, गांधारी पुलावरून विशाल, साक्षी आणि रिक्षा चालक मृतदेह असलेली पिशवी घेऊन भिवंडी पडघा दिशेने निघाले. बापगाव भागात अंधार तेथे कोणीही आजुबाजुला नाही. वाहनांची वर्दळ नाही पाहून विशालने मृतदेह बापगाव कबरस्तान भागातील जंगली झुडपे असलेल्या भागात फेकला.
विशालने आधारवाडी भागातून एका दुकानातून दारूची बाटली खरेदी केली. तेथून तो तात्काळ आपल्या पत्नीच्या माहेरी म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील गावी निघून गेला. पत्नी साक्षीला रिक्षा चालकाने घरी सोडले. कोणालाही या प्रकरणाचा संशय येऊ नये म्हणून साक्षीने कल्याणमधील घरीच राहणे पसंत केले. विशालच्या घराच्या बाहेर रक्ताचे डाग पडले होते. सीसीटीव्ही यंत्रणेने विशालला टिपले होते. विशालचा माग काढताच पोलिसांना त्याचा घराबाहेर रक्ताचे डाग आढळले. पोलिसांचा संशय बळावला. या प्रकरणाचा पोलिसांनी नंतर झटपट उलगडा करून विशाल, पत्नी साक्षीला, रिक्षा चालक यांचा सीसीटीव्ही चित्रणाव्दारे माग काढून त्याला बुलढाण्यातून अटक केली होती.
पोलिसांनी सलग तीन महिने या प्रकरणाचा सखोल चौकशी करून त्याने गुन्ह्याच्या वापरलेले हत्याचार, गांधारे नदीत फेकून दिलेली पिशवी इतर वस्तू जप्त केल्या होत्या. विशालसह पत्नीला कठोरात कठोर शिक्षा होईल, असे आरोपपत्र जलदगती न्यायालयात दाखल करण्यात आले होते.विशालवर एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये विनयभंग, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, चोरी, खुनाचा प्रयत्न, तडिपाराच्या आदेशाचा भंग करणे समावेश आहे. गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर विशाल पुन्हा गुुन्हे करत होता. बालिकेच्या हत्येपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने हे अघोरी कृत्य केले होते.
बालिकेच्या हत्येनंतर कल्याण, डोंबिवली शहर परिसरात विशाल गवळीला फाशी द्या या मागणीसाठी महिला संघटना, सामाजिक संस्था यांनी मोर्चे काढून घडल्या घटनेचा निषेध सुरू केला होता. विशाल गवळीला फाशी होत नाही तोपर्यंत हे निषेध मोर्चे सुरूच राहतील, असे इशारा सामाजिक संस्थांनी शासनाला दिले होते. विशालने गळफास घेतल्याचे वृत्त रविवारी सकाळी शहरात पसरताच विविध स्तरातून विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. विशाल गवळी आत्महत्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रतिक्रिया दिली आहे विशाल गवळी याला कायद्याने फाशी झाली असती तर असे कृत्य करणार्यांना अद्दल घडली असती ..कायद्याच्या शिक्षेला घाबरून त्याने आत्महत्या केली असावी .. पीडितेला आणि तिचा कुटुंबाला हा देखील नैसर्गिक न्याय मिळाल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले