DESK MARATHI NEWS.
टिटवाळा/प्रतिनिधी – पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीडपणे काम करणाऱ्या आणि सरकारी माती चोरीचा पर्दाफाश करणाऱ्या पत्रकार अजय शेलार यांना सोशल मिडियाद्वारे धमकी दिल्यानंतर याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत ‘निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या तिघा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा कल्याण तालुका पोलिस ठाण्यात या कायद्यांतर्गत नोंदविण्यात आलेला पहिलाच गुन्हा ठरला आहे.
१८ जून २०२५ रोजी शेलार यांनी प्रकाशित केलेल्या “सरकारी मातीची खासगी विक्री” या बातमीने प्रशासनात खळबळ माजवली होती. त्यानंतर संदीप नाईक या इसमाने २७ जून रोजी फेसबुक लाईव्ह करून आपल्या सहकार्यांसमवेत शेलार यांना “अजय शेलार पुन्हा आमच्या बातम्या लावशील तर समजून घे, तसेच समाजमाध्यमांवर त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. पत्रकारितेच्या स्वातंत्र्यालाच आव्हान उभे राहिले होते.
शेलार यांनी यासंदर्भात कल्याण तालुका पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात ‘निर्भय महाराष्ट्र पार्टी’चे राज्य संघटक मंत्री संदीप नाईक (बाबा),राजेंद्र जाधव व अनंता कोल्हे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तक्रारीला दिलेल्या गंभीर प्रतिसादामुळे आता इतर पत्रकारांमध्येही एक विश्वास निर्माण झाला आहे की, पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायदा आता प्रत्यक्षात उभा राहत आहे.हा गुन्हा केवळ एका पत्रकाराचा लढा नाही तर ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या हल्ल्याला दिलेली सडेतोड प्रतिक्रिया आहे. प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे पत्रकार संरक्षण कायद्या आणि पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न केंद्रस्थानी येणार हे निश्चित आहे.