नवी दिल्ली/प्रतिनिधी -आयएनएस सुनयना हे हिंद महासागरातील भारतीय नौदलाचे आयओएस(इंडियन ओशन शिप) म्हणून नियुक्त करण्यात आलेले जहाज काल, 12 एप्रिल 2025 रोजी टांझानियाच्या दार-एस-सलाम बंदरात दाखल झाले. हे जहाज 5 एप्रिल रोजी कर्नाटकातील कारवार येथून 9 परदेशी मित्र राष्ट्रांतील (एफएफएनएस) एकूण 44 नौदल कर्मचाऱ्यांसह निघाले होते. या एफएफएन देशांमध्ये कोमोरोस, केनिया, मादागास्कर, मालदीव, मॉरिशस, मोजांबिक, सेशेल्स, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे.
आयओएस सागरचे दार-एस-सलाम येथील आगमनावेळी टांझानिया नौदल प्रमुख रियर अॅडमिरल ए.आर. हसन, भारतीय नौदलाचे एसीएनएस(एफसीआय) रियर अॅडमिरल निर्भय बाफना, तसेच टांझानियातील भारतीय संरक्षण सल्लागार कमोडोर अग्यपाल सिंग, भारतीय उच्चायोगातील मान्यवर आणि टांझानिया पीपल्स डिफेन्स फोर्सच्या प्रतिनिधींनी स्वागत केले.
या बंदर भेटीदरम्यान हे जहाज नौदल सराव एआयकेईवायएमइ या नौदल सरावाच्या महत्त्वपूर्ण नौदल टप्प्यात सहभागी होईल. या सरावाचे उद्घाटन भारताचे संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ हे रविवारी 13 एप्रिल 2025 रोजी करणार आहेत. या सरावात कार्यक्षम समन्वय वाढवणे, संयुक्त रणनीती विकसित करणे आणि सागरी संचालनात एकत्र काम करण्याची क्षमता सुधारण्यावर भर दिला जाईल.
आयएनएस सुनयनासोबत, भारतीय नौदलाची आणखी दोन जहाजे – आयएनएस चेन्नई (विध्वंसक) आणि आयएनएस केसरी (जमिनीवर सैन्य, वाहनं आणि रसद उतरवणारी मोठी युद्धनौका) देखील या सरावात सहभागी होतील.
आयएनएस सुनयना वर एफएफएन मधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही या उपक्रमाच्या जागतिक सागरी सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाचे महत्त्व अधोरेखित करते. अशा सरावांद्वारे भारतीय नौदल सामूहिक सागरी सुरक्षा प्रस्थापित करण्यास, मैत्री वृद्धिंगत करण्यास आणि क्षेत्रातील जलवाहतुकीचे मार्ग सुरक्षित आणि मोकळे ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे.
आयओएस सागर अभियाना अंतर्गत आयएनएस सुनयना 15 एप्रिल 2025 रोजी दार-एस-सलामहून पुढील बंदर भेटीसाठी – नकाला, मोजांबिककडे प्रस्थान करेल.