DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांची समक्ष पाहणी केली. महापालिकेमार्फत चालू वर्षी 10 प्रशासकीय प्रभागात 19 ठेकेदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे व सर्व ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
आज आयुक्त अभिनव गोयल यांनी कल्याण पश्चिम भागातील मिलिंद नगर, गौरीपाडा, योगी धाम तसेच कल्याण पूर्व भागातील पूना लिंक रोड, चक्की नाका व मलंग रोड या ठिकाणच्या कामांची पाहणी करून परिसरातील नागरिकांशी संवाद साधला, तसेच कामे योग्य पद्धतीने व दर्जेदार होण्याच्या दृष्टीने तसेच कामाचा वेग वाढविणे बाबत प्रभागातील कनिष्ठ अभियंता व उप अभियंता तसेच ठेकेदार यांना सक्त निर्देश दिले. आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरून कामांची पाहणी केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सदर पाहणी दरम्यान महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे , मनोज सांगळे व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी महानगरपालिकेमार्फत 18002330045 हा टोल फ्री नंबर 24 तास उपलब्ध ठेवण्यात आला असून त्यावर नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांविषयी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन महानगरपालिके मार्फत करण्यात येत आहे.