मुंबई/प्रतिनिधी – मुंबईतल्या एनएफडीसी संकुलात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (आयआयसीटी) च्या पहिल्या कॅम्पसचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले. प्रशासकीय इमारत आणि वर्ग दोन्हींचे उदघाटन यावेळी झाले. त्यानंतर, एनएफडीसी-नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (एनएमआयसी) येथील गुलशन महल येथे वेव्हज 2025 भारत दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज 2025) फलनिष्पत्ती अहवालाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश सिंह मीना आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. आयआयसीटी लोगोचे अनावरण आणि सतरा अभ्यासक्रमांचे औपचारिक उद्घाटनही या कार्यक्रमात झाले.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ लिमिटेडच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि प्रसारभारती यांच्यात एक सामंजस्य करार यावेळी झाला. याद्वारे देशातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात सर्जनशीलतेचे महत्त्व ओळखून, एकात्मिक चित्रपट आणि दूरचित्रवाणी माध्यम केंद्र विकसित करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. यामुळे माध्यम क्षेत्रात नवोन्मेष, कौशल्य विकास आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन मिळेल.
देशाची मनोरंजन राजधानी असणाऱ्या मुंबईत पहिल्या वेव्हज शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारचे आभार मानले. यावर्षी मुंबईत 1 ते 4 मे या कालावधीत पहिल्या वेव्हज शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतात जागतिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून ‘वेव्ह्स (WAVES)’चे यशस्वी आयोजन करण्यात आले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘वेव्ह्स (WAVES)’ आता एक चळवळ बनली आहे आणि या घटनेचे जागतिक स्तरावर पडसाद उमटत आहेत.
‘वेव्ह्स (WAVES)’ ने सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक नवीन मंथन सुरू केले आहे, असेही ते म्हणाले. ‘वेव्ह्स (WAVES)’ उपक्रमाला आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 150 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. फिल्म सिटी येथे आकाराला येत असलेले आयआयसीटी कॅम्पस, हे केवळ जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणूनच नव्हे, तर जगभरातील लोकांना आकर्षित करणारी वास्तू आणि सांस्कृतिक चिन्ह म्हणून उदयाला येईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, वेव्ह्स (WAVES) 2025 मध्ये प्रशंसेला पात्र ठरलेले आणि आता एनएमआयसी मधील गुलशन महाल येथे स्थलांतरित झालेले भारत पॅव्हेलियन मुंबईच्या पर्यटन सर्किटमध्ये एका नव्या सांस्कृतिक स्थळाची भर घालणार आहे. त्यांनी असेही सांगितले की, ‘वेव्ह्स’ दरम्यान जाहीर करण्यात आलेला आणि सुरुवातीला 42 कंपन्यांचा समावेश असलेला ‘वेव्ह्स (WAVES)’ निर्देशांक, ज्याचे एकत्रित मूल्यांकन अंदाजे 93,000 कोटी रुपये होते, त्याने अल्पावधीतच 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामधून सर्जनशील निर्माती अर्थव्यवस्थेची जलद वाढ आणि अफाट क्षमता स्पष्टपणे प्रतिबिंबित होते, असेही ते म्हणाले.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सर्जनशील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आयआयटी आणि आयआयएम च्या दर्जाची संस्था असावी, असे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न होते, आणि आयआयसीटीची स्थापना हा त्या दिशेने एक महत्वाचा निर्णय आहे. ते पुढे म्हणाले की, सर्जनशील अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांना नवीन कौशल्ये, प्रशिक्षण आणि साधने उपलब्ध करून देणे आणि जगातील सर्वोत्तम पद्धती भारतात आणणे महत्वाचे आहे. तरच भारतात नवीन इन्क्युबेशन, नवीन कल्पना आणि नवे तंत्रज्ञान तयार होईल, असे वैष्णव यांनी सांगितले. अल्पावधीतच पहिले आयआयसीटी कॅम्पस सुरू झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. फिल्म सिटी येथे महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर उभारण्यात येणारा नवीन कॅम्पस सौंदर्यशास्त्रीय निकषांना अनुसरून आणि निसर्गरम्य वातावरणाशी सुसंगत असेल. आयआयसीटीसाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्र्यांनी दिली. आयआयसीटीमध्ये व्हीएफएक्स, पोस्ट प्रॉडक्शन, एक्सआर, गेमिंग आणि अॅनिमेशनमधील पूर्णपणे उद्योग-संलग्न प्रगत कार्यक्रम असतील, अशी माहितीही वैष्णव यांनी दिली. उद्योग-शिक्षण एकत्रीकरणाच्या भावनेतून आयआयसीटीने गुगल, मेटा, एनव्हीडिया, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अॅडोब आणि डब्ल्यूपीपी सारख्या कंपन्यां बरोबर औपचारिक भागीदारी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, पहिल्या बॅचमध्ये 300 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे आणि एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील व्यावसायिक आणि प्रशिक्षकांना प्रगत प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) संचालक शेखर कपूर आणि प्रसिद्ध गीतकार तसेच केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळाचे (CBFC) अध्यक्ष प्रसून जोशी देखील उपस्थित होते.
भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेविषयी (IICT)
भारतीय सर्जनशील तंतज्ञान संस्था (IICT) येत्या ऑगस्ट महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करत आहे. या घडामोडीसह आता भारताची वेगाने वाढत असलेली डिजिटल आणि सर्जनशील अर्थव्यवस्था एका परिवर्तनकारी झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संस्थेद्वारा ए.व्ही.जी.सी.-एक्स.आर. (AVGC-XR – ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी) क्षेत्रात उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांचा एक मजबूत संच उपलब्ध करून दिला जाणार आहे.
भारताच्या कालातीत कथात्मक मांडणीच्या वारशाचे आणि हा वारसा जागतिक आशय-सामग्री निर्मितीच्या बहुआयामी भविष्याच्या दिशिने घेत असलेली झेप, एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरी करण्याच्या उद्देशाने मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथे आयोजित केल्या गेलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्हज शिखर परिषद (WAVES) 2025 मध्ये उभारलेले भारत पॅव्हेलियन या परिषदेचा केंद्रबिंदू ठरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन झाले होते. हे पॅव्हेलिअन अर्थात बहुपदरी दालन म्हणजे भारताचा सांस्कृतिक आत्मा आणि कलेपासून कोड (Kala to Code) पर्यंतच्या त्याच्या डिजिटल परिवर्तनाचा केला गेलेला गौरवच होता. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वात साकारलेले हे भारत पॅव्हेलियनचे म्हणजे देशाला सर्जनशील क्षेत्रातील एक महासत्ता बनण्याच्या आकांक्षाचे प्रतिनिधित्व करणारे दालन होते. भारत पॅव्हेलियनमध्ये मांडलेल्या विविध क्षेत्रांशी संबंधित संकल्पनाधारीत प्रदर्शनांनी अभ्यांगतांना एक गहिरा अनुभव दिला आणि त्यासोबतच आशय-सामग्री, सर्जनशीलता आणि संस्कृतीच्या माध्यमातून चालना दिली जात असलेल्या ऑरेंज इकॉनॉमीला चालना देण्याच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबही या प्रदर्शनांतून उमटले होते.