नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
बुलढाणा/प्रतिनिधी – अवैधरीत्या लाकडाची वाहतूक करणारा ट्रक वनपरिक्षेत्र फिरते पथकाने जनुना चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान पकडून मोठ्या प्रमाणावर लाकूड जप्त केले आहे. या प्रकरणी सदर ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आर.पाटील यांच्या फिरते पथकातील कर्मचारी सुनील जाधव, वनपाल आर.बी.वाघ वनरक्षक जुमळे, यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी खामगाव बायपास वरील जनुना चौफुलीवर नाकाबंदी करून ट्रकला थांबवून पाहणी केली असता त्या ट्रकमध्ये अडजात जळते व विविध प्रकारचे लाकूड दिसून आले.
याबाबत ट्रक चालकाला परवाना विचारला असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे कुठलाही परवाना आढळून न आल्याने सदर ट्रक चालकास ट्रक ताब्यात घेऊन ट्रकसह लाकूड 5 लाख 62 हजार 149 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रकचालक सलमान खान फिरोज खान रा. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश याच्याविरुद्ध वन कायद्यानुसार विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



