DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -भ्रष्टाचाराची कीड कल्याण डोंबिवली महापालिकेची पाठ सोडता सोडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका भ्रष्टाचाराची बजबजपुरी म्हणून विख्यात असून आजमितीला अनेक लाचखोर अधिकारी व कर्मचार्याना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. यंत्रणा व्दारेकठोर कारवाई होत नसल्याने भ्रष्टाचाराची प्रकरणे पालिकेत वाढतच आहे. आता आकडा अर्धा शतक पार लवकरच करणार असे चित्र दिसत आहे.
गुरुवारी ठाणे लाचलुचपत विभागाने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या दोन वेगवेगळ्या विभागात ट्रॅप लावून तीन जणांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. यामध्ये आरोग्य विभागातील दोन जण व मलनिस्सारण विभागातील एकाला लाच प्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. पालिकेत जणू लाच स्वीकारत अटक होण्याची स्पर्धाच पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवली मनपाच्या स्थापनेपासून आतापर्यंत ४७ हून अधिक अधिकारी, कर्मचारी लाच प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.
घनकचरा विभागातील आरोग्य निरिक्षक वसंत देगलूरकर ,आणि सहकारी सुर्दशन जाधव या दोघांना आजारी असलेल्या कर्मचाऱ्याकडून पुनः कामावर रुजू करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले ,तर कल्याण डोंबिवली मलनिस्सारण विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र अहिरे, यांनी एका विकासाला एनओसी देण्यासाठी ४० हजार रूपयांची लाच प्रकरणी रंगेहाथ अटक केली. या दोन लाचलुचपत विभागाच्या सापळ्याच्या जाळ्यात तीन जण अडकल्याने पालिका वर्तुळात सन्नाटा पसरला होता. अशा भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे पालिकेची अब्रु वेशीवर टांगली असल्याची लाजिरवाणी बाब समोर आली आहे. सरकारी बाबूंची ही खाबुगिरी संपणार तरी कधी असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.