DESK MARATHI NEWS.
ठाणे/प्रतिनिधी – राज्यातील सर्व शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांची अधिकृत शिखर संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मुख्य मार्गदर्शक, सल्लागार श्री.गणपत दिनकर कुलथे, यांचे वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळाने तसेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या नेरुळ येथील राहत्या घरी काल दि.14 एप्रिल रोजी रात्री 9.00 वाजता निधन झाले. आज त्यांच्या कुटुंबियांच्या तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नेरूळ येथील शांतीधाम येथे श्री.कुलथे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुलथे कुटुंबियांसमवेत विविध शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, विविध संलग्न संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, राजपत्रित अधिकारी महासंघाचे माजी अध्यक्ष रवींद्र धोंगडे, विद्यमान अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, दुर्गा मंचच्या अध्यक्षा डॉ.सोनाली कदम, माजी माहिती संचालक देवेंद्र भुजबळ आदींनी यावेळी स्वर्गीय श्री.कुलथे यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थित सर्वांनी स्वर्गीय ग.दि.कुलथे यांचे संघटना चळवळीतील राहिलेले अपूर्ण कार्य त्याच तडफेने, प्रामाणिकपणाने पूर्ण करण्याचा संकल्प करून स्व. श्री.कुलथे यांना श्रद्धांजली वाहिली.
स्व.श्री.ग.दि.कुलथे यांचा अल्प परिचय:-
•श्री.गणपत दिनकर कुलथे,
•जन्म -१.३.१९३९ रोजी, पारनेर (अहमदनगर) येथील.
•शिक्षण कमवा व शिका योजनेतून रयत शिक्षण संस्थेत सातारा येथे.
•लिपिक म्हणून विक्रीकर विभागात सेवा सुरुवात केली आणि कर्मचारी संघटनेत ते स्थिरावले. कर्मचारी संघटनेत विविध पदावर काम करीत बृहन्मुंबई कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस पदी प्रभावीपणे कार्य केले.
•अधिकारी पदावर पदोन्नत झाल्यानंतर विक्रीकर अधिकारी संघटनेत देखील महत्वाची पदे भूषविली.
•विक्रीकर विभागात कार्यरत असतानाच ७ फेब्रुवारी १९८६ रोजी महासंघाची स्थापना केली. सदर महासंघात प्रथम ७ विभागीय संघटना होत्या त्याच विस्तार होऊन ७२ विभागीय संघटनांना सामावणारा अधिकारी महासंघ आज ३९ वर्षाच्या वटवृक्षासारखा विस्तारला आहे.
•अशा प्रकारे तब्बल ५० वर्षाहून अधिक काळ संघटन चळवळीत सहभागी राहिले आहेत. त्यातच १९९६ साली सेवानिवृत्तीनंतर देखील तब्बल २९ वर्षे राजपत्रित अधिकारी महासंघाचे कार्य अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करीत होते.
•साहेबांच्या कार्यकाळात अधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक झाली असून त्यात सर्व वेतन आयोगांची केंद्राप्रमाणे राज्यात अंमलबजावणी झाली. महागाई भत्ता आणि इतर लाभ मिळत राहिले, अधिकाऱ्यांच्या पाल्यांना देखील अनुकंपा तत्वावर भरतीचा लाभ आदी बरेच प्रश्न सुटले आहेत. त्यातच अधिकाऱ्यांच्या कल्याणार्थ उभारत असलेले बांद्रा पूर्व येथील कल्याणकेंद्र हा त्यांचा महत्वकांशी प्रकल्प आहे.
•आता त्यांची स्वप्न पूर्ती करण्यासाठी अधिकारी परिवारास एकत्र येऊन प्रयत्न करावयाचे आहे. कल्याणकेंद्र इमारत उभारल्यास तीच खरी कै.ग.दि.कुलथे साहेबांना श्रद्धांजली ठरेल.