नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – रविवार, २१ ऑगस्ट रोजी, लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव सांगता समारंभ पु ल कट्टा, कल्याण संस्थेने आयोजित केला होता. या प्रसंगी, ९५ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे हे अध्यक्षपदावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ‘कोणत्याही कवी, लेखक कलावंत याची कलाकृती घडत असताना त्याला एक ईश्वरी देणगी किंवा प्रतिभेचे वरदान लाभलेले असते. त्याची कलाकृती, कविता, कथा किंवा इतर साहित्य हे किती सकस आहे किती, ताकदवान आहे ते येणाऱ्या 100 वर्षानंतर लक्षात येत असते. आणि कोणत्याही कवी, लेखक, कलावंताच्या जन्मानंतर शंभर वर्षांनी त्या कवीची, लेखकाची आठवण येणं आणि त्यांचा असा हा वर्षभर जन्मशताब्दी सोहळा साजरा करणे म्हणजे ही त्या कवीच्या कवितेची ताकद आहे. आणि तीच ताकद वामनदादा कर्डक यांच्या कवितेची आहे. म्हणूनच पु ल कट्ट्याने वर्षभर जन्मशताब्दी साजरी करून आज इतका सुंदर सांगता समारोह आयोजित केला आहे.”
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे, तसेच ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे व ज्येष्ठ समीक्षक निळकंठ कदम उपस्थित होते.
यावेळी स्वागताध्यक्ष विश्वनाथ भोईर यांनी, ‘मी एक साधा साहित्यरसिक आहे. अपघाताने राजकारणात आलो आहे त्यामुळे मी वीस टक्के राजकारण आणि ऐशी टक्के समाजकारण करीत असतो. आणि म्हणूनच मी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी समितीचे स्वागताध्यक्षपद आनंदाने स्वीकारले. लहानपणापासून वामनदादा यांची गाणी ऐकली होती. तेव्हापासून त्यांच्याबद्दल एक आदर निर्माण झाला होता आणि आज योगायोगाने त्यांच्याच जन्मशताब्दीचा स्वागताध्यक्ष होण्याचा मान मला मिळालेला आहे, याचा मला विशेष आनंद झाला आहे!’ असे नमूद केले.
स्वागताध्यक्ष आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मशताब्दी समितीतीने गेले वर्षभर महाराष्ट्रभर विविध ठिकाणी कार्यक्रम करून वामनदादा कर्डक यांच्या कवितेचा, गीतांचा व विचारांचा जागर केला आहे, या शिवाय वर्षभर गीत गायन स्पर्धा, काव्य वाचन, महिला विशेष राज्यस्तरीय काव्यसंग्रह पुरस्कार स्पर्धा, नाशिक येथील साहित्य संमेलन दिंडी, उदगीर साहित्य संमेलन दिंडी , तसेच परिसंवाद, वामनदादा आणि आठवणी , ‘हे गीत वामनाचे’ हा गायक मिलींद मोरे आणि आशालता भगत यांचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम संस्थेने वर्षभर राबवले. जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचे अध्यक्षतेखाली कल्याण येथे संपन्न झाला.
अर्जुन डांगळे यांनी आपल्या भाषणात वामनदादा यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेऊन त्यांची गीते समाजाला काही दिशा देणारी होती याबाबत मार्गदर्शन केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी आपल्या भाषणात वामनदादा यांच्या कार्याचा आणि गीताचा गौरव केला. कवी निळकंठ कदम यांनी कविता कशी असावी कविता काय असते याबाबत मार्गदर्शन केले.जन्मशताब्दी महोत्सव समिती आयोजित , ‘वामनदादा कर्डक राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह – महिला विशेष’ हा पुरस्कार, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते, विजेत्या सारिका उबाळे- परळकर यांना ‘कथार्सिस’ या काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख दहा हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे होते.
या वेळी, पु ल कट्टा लोक लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीने, साहित्य क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ कवी अरुण मात्रे, रवींद्र लाखे व प्रा प्रशांत मोरे यांना ‘प्रतिभा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. रोख रुपये दहा हजार, सन्मान चिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच ज्यांनी वामनदादाप्रमाणे आपले जीवन गीत, संगीत आणि चळवळीकरिता अर्पण केले व आपल्या गीताच्या माध्यमातून समाज जागृतीचं काम पुढे चालवत आहेत अशा जेष्ठ कवी, कार्यकर्ते यांचा सन्मान ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले.
अहमदनगरचे माधवराव गायकवाड यांनी वामनदादांची विखुरलेली ५००० गाणी संकलित करून पाच खंड प्रकाशित केले आहेत. माधवराव गायकवाड तसेच ज्येष्ठ गायक कवी, संगीतकार प्रभाकर पोखरीकर आणि ज्येष्ठ कवी भीमराव कालेनंद यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये १०,०००/-, सन्मानचिन्ह असे आहे.
आरोग्य, वाचन संस्कृती, संगीत, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा ‘सन्मान अविरत सेवा सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. सोशल सर्विस लीगचे धर्मार्थ डोळ्याचे हॉस्पिटल , कल्याण महिला मंडळ, कल्याण गायन समाज आणि सार्वजनिक वाचनालय कल्याण, वि केअर ट्रस्ट आणि लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान,नाशिक या संस्थाचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभिनेते, सूत्रसंचालक आणि कवी, कोणत्याही संस्थेला, कोणत्याही कार्यक्रमाला निरपेक्षपणे सहकार्य करणारे कार्यकर्ते सुधीर चित्ते यांना दहा हजार रुपये रोख व शाल, सन्मानचिन्ह असा ‘लोककवी वामनदादा कर्डक स्मृती निरलस सेवा कार्यकर्ता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्याचप्रमाणे यावेळी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जीवनावर आधारित, पुल कट्टा निर्मित आणि संघर्ष गांगुर्डे दिग्दर्शित, “वादळ वारा” या चित्रफीतचे लोकार्पण करण्यात आले. तसेच वामनदादा कर्डक, कवयित्री शांता शेळके, कवी वसंत बापट या त्रयींच्या जन्मशताब्दीनिमित्त, त्यांच्या निवडक गीतांचा “त्रिधारा संगम” हा सांगीतिक कार्यक्रम करून त्याना अभिवादन करण्यात आले. गायक – संगीतकार गिरीश जोशी आणि सहकारी यांनी हा सांगीतिक कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले तर कवितेची पखरण करीत खुमासदार सूत्रसंचालन सुधीर चित्ते व ज्योती हनुमंत भारती यांनी केले.
आभार प्रदर्शन डॉ गिरीश लटके यांनी केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वश्री प्रा महेंद्र भावसार, भिकू बारस्कर, रवीकुमार ढोमसे, अम्मार काझी, राजू गवळी, गौतम मोरे, संजय वाजपेयी, दामोदर काबरा, रमेश आव्हाड, राजेश देवरुखकर, सुधाकर वसईकर, योगेश शहा, प्रा सुदर्शन पाटील, बबन पाटील, साक्षी डोळस, लता पालवे, संतोष निरभवणे, दादा भादवे, प्रशांत तोष्णीवाल, अर्जुन डोमाडे, किशोर खराटे आणि समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



