नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीची अवकळा बसली आहे. बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार वादळी पाऊस झाला. तर मोताळा तालुक्यात काही ठिकाणी प्रचंड गारपीटीने शेतपिकांचे अफाट नुकसान झाले आहे. काल देखील वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. आज परत मोताळा तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे.
मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. या पावसामुळे मका, ज्वारी, कांदा, गहू, केळी बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, मका सोंगणीला आले होते. पण अचानक गारपिटीसह पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याने आपल्या लेकरासारखं मायेने आणि कष्टाने वाढविलेलं पीक एका क्षणात उद्ध्वस्त झालं.
शेतकरी व फळ उत्पादक चिंतेत पडले आहेत. या अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शक्य तितक्या लवकर मदत द्यावी अशी मागणी केली आहे.



