नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या अधिक वीजहानी असणाऱ्या कल्याणमधील मोहने, टिटवाळा भागात व पालघर विभागात वीज चोरट्यांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. ७ आणि ८ डिसेंबरला राबवण्यात आलेल्या या मोहिमेत २९१ वीज चोरट्यांना कारवाईचा शॉक देण्यात आला.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औढेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक वीजहानी असणाऱ्या वीज वाहिन्यांवर गेल्या दोन महिन्यांपासून व्यापक शोध मोहीम सुरू आहे. त्यानुसार पालघर विभागातील पालघर, डहाणू, बोईसर ग्रामीण, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, सफाळे, तलासरी या उपविभागात अधिक वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवरील १ हजार ७७५ वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात १८२ ठिकाणी वीजचोरी तर १० ठिकाणी विजेचा अनधिकृत वीजवापर आढळून आला. जवळपास २५ लाख रुपये किंमतीची २ लाख युनिट वीजचोरी या मोहिमेत पकडण्यात आली.
टिटवाळा उपविभागातील गोवेली रोड, टिटवाळा, नांदप रोड, बल्याणी गाव, उंबरणी रोड परिसरात २ हजार ८६० वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात ८६ जणांकडे वीजचोरी तर ४ जणांकडे अनधिकृत वीजवापर आढळला. कल्याण पश्चिमेतील मोहने वीजवाहिनीवर ७ हजार ४०७ वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात २३ ठिकाणी वीजचोरी व ४ ठिकाणी अनधिकृत वीजवापर सापडला.



