नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – आजारी व अपघातग्रस्त रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू घडल्याच्या घटना अनेकदा घडतात. रुग्णालयातील गलथान कारभार आणि रुग्णालय प्रशासनावर या निमित्ताने नागरिकांना आक्षेप असणे स्वाभाविक आहे. परंतु यामुळे मारहाणीचे प्रकरण नुकतेच अमरावती येथे घडले आहे. रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाचा वेळेवर योग्य उपचार न केल्याचा आरोप करत अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुणालयात डॉक्टर आणि रुग्णामध्ये तुफान मारामारी झाली.
दारापूर येथील एक रुग्ण सकाळी रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र, त्या रुग्णांवर सायंकाळ पर्यत कुठलाही उपचार केला गेला नाही. कोणतेही औषध डॉक्टरांनी दिले नसल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला असून याची विचारणा करायला गेलेल्या रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात जोरदार भांडण झाले.या भांडणाचे रूपांतर नंतर तुफान मारामारीत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रात्री रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी गाडगे नगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि रुग्णालयाविरोधात तक्रार केली असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत. सध्या मारहाण केलेल्या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असून जखमी रुग्णावर उपचार सुरू आहेत.



