नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – मुंबई, ठाणे यांसारख्या भागात अनेक फेरीवाले बसतात. फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. त्यावरच त्यांचे पोट अवलंबून असते. पण फेरीवाल्यांमुळे रहदारीच्या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पालिकेने केलेल्या अतिक्रमण कारवायांचा काहीच परिणाम या फेरीवाल्यांवर होत नाही. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे फेरीवाले चर्चेत असतात. आता पुन्हा फेरीवाले चर्चेत आले आहेत. फेरीवाल्यांसोबत केडीएमसी उपायुक्तांनी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे.
१७ एप्रिल रोजी कल्याण स्टेशन परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्याकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात होती. त्याचवेळी त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला इरफान कुरेशी हा चष्मे विकणारा फेरीवाला होता. तो त्याचा चष्मे विक्रीचा स्टॉल मागे घेतच होता. त्याच वेळी संतप्त झालेल्या उपायुक्त तावडे यांनी कुरेशी याची गचांडी धरली त्याला खाली पाडून लाथांनी मारहाण केली त्याच्या मालाची नासधूस करीत तो जप्त केला. भर रस्त्यात एका फेरीवाल्यास केडीएमसीच्या उपायुक्तांनी लाथाडल्याचा आरोप करत महाराष्ट्र पथारी सुरक्षा दल संघटनेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले आहे. तसेच कारवाई न झाल्यास मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा वळवणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे.
फेरीवाल्यांसोबत उपायुक्तांनी केलेल्या या गैरकृत्याचा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे प्रमुख आबासाहेब शिंदे यांनी निषेध व्यक्त करत उपायुक्तांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु केले. मात्र अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने या आंदोलनाकडे सगळ्यांचे दुर्लक्ष होत आहे. पालिका प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई केली नाही तर या आंदोलनाचा मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने वळवणार असल्याचा इशारा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दल संघटनेने पालिका प्रशासनाला दिला आहे.
आपल्याकडे बेरोजगारी सारखी मोठी समस्या असल्यामुळे फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच पालिकेकडून केल्या जाणाऱ्या अतिक्रमण करवायांमुळे बऱ्याचदा फेरीवाल्यांचे फार नुकसान होते. फेरीवाल्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रशासनाने लवकरात लवकर मार्ग काढणे गरजेचे आहे.