DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – प्रतिवर्षाप्रमाणे संत निरंकारी मिशन मार्फत 24 एप्रिल रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ मानव एकता दिवसाच्या प्रसंगी मिशन कडून देशभर रक्तदानाच्या एका प्रेरक श्रृंखलेचा शुभारंभ होतो. यावर्षी सुद्धा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन मार्फत पूर्ण भारतवर्षात सुमारे 500हून अधिक शाखांमध्ये भव्य रक्तदान शिबिरांची अखंड श्रृंखला आयोजित करण्यात आली. सम्पूर्ण भारतभर आयोजित रक्तदान श्रृंखलेअंतर्गत सुमारे 30 हजार यूनिट रक्त संकलित करण्यात आले.
मानव एकता दिवसाचे औचित्य साधून मुंबई महानगर प्रदेशात ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये एकंदर 1258 युनिट रक्त संकलित केले गेले. त्यापैकी संत निरंकारी सत्संग भवन, चेंबूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात 230 निरंकारी भक्तांनी रक्तदान केले ज्याचे संकलन संत निरंकारी रक्तपेढी, विले पार्ले मार्फत करण्यात आले. दूसरे शिबिर संत निरंकारी सत्संग भवन, ओसवाल नगरी, नालासोपारा येथे आयोजित करण्यात आले ज्यामध्ये 465 निरंकारी भक्तांनी रक्तदान केले. या शिबिरामध्ये नायर हॉस्पिटलने 175 यूनिट, जे.जे.हॉस्पिटलने ने 129 यूनिट तर जगजीवनराम हॉस्पिटलने 161 युनिट रक्त संकलित केले. तिसरे शिबिर ग्राम सेवालय, उंबरपाडा, सफाळे (पूर्व) येथे आयोजित केले होते ज्याठिकाणी के.ई.एम.हॉस्पिटलकडून 259 युनिट रक्त संकलित केले गेले. चौथे शिबिर संत निरंकारी सत्संग भवन, मोठा गाव, डोंबिवली येथे आयोजित करण्यात आले ज्यामध्ये 304 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. याठिकाणी जे.जे.महानगर रक्तपेढीने रक्त संकलन केले.
हे महाअभियान केवळ रक्तदान नसून सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचा करुणा, सेवा आणि एकत्वाचा संदेश जीवनात उतरविण्याचे सजीव माध्यम आहे जे आम्हाला शिकवते, की मानवता हाच सर्वोच्च धर्म होय. याच प्रेरणेने युक्त संत निरंकारी मिशन, सेवा आणि समर्पणाच्या पथावर निरंतर मानवतेचा मार्ग प्रशस्त करत आहे. मानव एकता दिवसाच्या निमित्ताने मुंबई महानगर प्रदेशामध्ये सुमारे 60 ठिकाणी विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले ज्या द्वारे बाबा गुरबचनसिंहजी व अन्य बलिदानी संतांच्या दिव्य जीवनातून प्रेरणा प्राप्त करण्यात आली.