DESK MARATHI NEWS.
कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील शहाड येथील नामवंत देवजीभाई हरिया विधी महाविद्यालयास नुकतीच राष्ट्रीय मूल्यांकन , मान्यता परिषद (एन ए ए सी) यांची महत्त्वपूर्ण मान्यता प्राप्त झाली आहे. या घडामोडीमुळे शहाड परिसरातील तसेच आजूबाजूच्या भागातील विधी शिक्षण क्षेत्रात एक नवा विश्वास आणि उर्जित विकास निर्माण झाला आहे.नव्याने अधिवक्ता होण्याची संधी जवळ च उपलब्ध होणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने मागील काही वर्षांत शिक्षणाची गुणवत्ता, संशोधन कार्य, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक सुविधा आणि अभ्यासक्रमातील आधुनिकतेच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याच प्रयत्नांची दखल घेत राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने ही मान्यता प्रदान केली आहे.
ही मान्यता मिळवण्यासाठी परिषदेच्या निरीक्षक समितीमार्फत महाविद्यालयाच्या अध्यापन, परीक्षा पद्धती, विद्यार्थ्यांचे हित, प्रशासनाची कार्यक्षमता, सामाजिक सहभाग आणि एकूणच शैक्षणिक गुणवत्ता या सर्व बाबींचे सखोल मूल्यमापन करण्यात आले.
या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक विश्वासार्हतेत मोठी भर पडली असून, हे यश विद्यमान तसेच भावी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी अधिक सक्षम करता येईल, असा विश्वास प्रकट करण्यात येत आहे.
प्राचार्य डॉ. सूर्यकांत भोसले म्हणाले, “ही मान्यता केवळ शिक्षकवर्गाच्याच नव्हे, तर आमच्या विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचा सन्मान आहे. भविष्यात अधिक संशोधनाधारित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.”
या यशस्वी वाटचालीत डॉ. लक्ष्मणराव ढोबळे,अब्राहम आवळे, जयंतीभाई हरिया, डॉ. श्वेता शेट्टी क्रांती आवळे, डॉ. गिरीश लटके, ॲड.कल्याणी वानखेडे आणि ग्रंथालय टीम यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे.
स्थानिक पातळीपासून राज्यभरातून विद्यार्थ्यांनी आता अधिक आत्मविश्वासाने या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सुरुवात केली असून, पालकवर्ग आणि माजी विद्यार्थ्यांतून समाधानकारक प्रतिक्रिया उमटत आहेत.