नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – मोठ्या भावास दारुचे व्यसन जडले होते. दारु पिण्यासाठी त्याने अनेक लोकांकडून पैसे घेतले होते, तर तो घरी देखील त्रास देत होता. म्हणून त्याला धमकावून धडा शिकविण्याचा कट धाकट्या भावाने रचला आणि मित्रांच्या मदतीने त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना गेवराई शहरात घडली आहे.
मयत मनोहर पुंड हा सहकुटुंब गेवराई शहरातील रंगार चौक भागात राहत होता. मनोहर मोठा असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. मात्र, त्याला दारुचे व्यसन लागले आणि त्याने अनेकांकडून उसनवारी पैसे घेतले. तर कुटुंबातील लोकांना देखील त्रास देऊ लागला. म्हणून याला धमाकावल्यावर हा ठिक होईल, त्यामुळे मोठ्या भावाला मारहाण करण्याचा निर्णय धाकट्या भावाने घेतला आणि मित्रांच्या मदतीने त्याला धमकावून लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. मात्र, मोठा अनर्थ घडला आणि या मारहाणीत भाऊ मनोहर यांचा मृत्यू झाला.
सदरची घटना शहराजवळ असलेल्या चिंतेश्वर मंदिराजवळ घडली आहे. पोलिसांना सदरील ठिकाणी मृतदेह असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करुन मृतदेह तपासणीसाठी पाठविण्यात आला. व मयताच्या धाकट्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशी करत असताना आपणच मित्रांसोबत हे कृत्य केले असण्याची कबुली धाकटा भाऊ दर्शन पुंड याने पोलिसांना दिली. यावरुन गेवराई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



