नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) वतीने आयोजित यशस्विनी महिला मोटारसायकल रॅली आज मुंबई येथून गुजरातच्या दिशेने रवाना झाली. महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून त्यांना मार्गस्थ केले. याप्रसंगी गणेश, कोळी नृत्य, स्व-संरक्षण, शिवकालीन युद्धकला तसेच घूमर नृत्य यांचे सादरीकरण झाले.
या रॅलीच्या माध्यमातून सीआरपीएफमार्फत समाजात महिलांचे महत्व तसेच महिला सशक्तीकरण वाढवण्याच्या हेतूने ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियानाबाबत जनजागृती निर्माण करण्यात येत आहे.
समाजात महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी यशस्विनी रॅली हे सीआरपीएफचं एक सकारात्मक पाऊल आहे. बेटी बचाओ, बेटी पाढाओ योजनेचे भविष्यात चांगले परिणाम दिसतील, असे प्रतिपादन आदिती तटकरे यावेळी केले .
यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबईच्या आयुक्त रूबल अग्रवाल, मुंबई जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस महानिरीक्षक एस. रणपिसे, पोलीस उपमहानिरीक्षक चंद्र भूषण, पोलीस महानिरीक्षक वैभव निंबालकर, 102 बटालियन कमांडंट जतिन किशोर यांच्यासह अधिकारी आणि जवान उपस्थित होते.
सीआरपीएफची महिला रॅली ही संपूर्ण देशभरात दिनांक 5 ऑक्टोबर 2023 पासून श्रीनगर (जम्मू कश्मीर), शिलांग (मेघालय) आणि कन्याकुमारी (तामिळनाडू) या तीन ठिकाणांहून सुरू झाली आहे.
या रॅलीची सांगता एकता स्मारक, केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी दिनांक 31 ऑक्टोबर 2023 ला होईल.