सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – अलौकीक निसर्ग सौंदर्य आणि पर्यटनासाठी कोकण प्रसिद्ध आहे. कोकणातला रानमेवा चाखण्यासाठी पर्यटक खूप लांबचा प्रवास करून येतात. त्यात मे महिन्यात येणाऱ्या जांभळावर चाकरमानी चांगलाच ताव मारतात. पण यावर्षी मुंबईकर असो किंवा कोकणातील रहिवासी यांना जांभूळ चाखायला मिळणे कठीण झाले आहे. अवकाळी पाऊस, धुके यामुळे जांभूळ फळावर मोठा परिणाम झाला आहे.
जांभळाच्या पिकाला मोहर न आल्याने यावर्षी कोकणातील फळ व्यापाऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वाधिक जांभूळ मुंबईकडे विक्रीसाठी पाठवले जातात. पण यंदा या फळाचे उत्पादन केवळ ८ ते १० टक्के झाले आहे. त्यामुळे येथील व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला असल्याचे जांभूळ व्यापारी सतीश बांबर्डेकर यांनी सांगितले आहे. आंबा, काजू, फणस आणि जांभूळ यावर कोकणातील फळ विक्रेते अवलंबून असतात. मात्र, यंदा जांभूळ पिकाने दगा दिल्याने फळ व्यापारी चिंतेत सापडले आहे.



