DESK MARATHI NEWS.
पुणे/प्रतिनिधी – केंद्र सरकारने जातीय जनगणना घेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली असली, तरी तो फसवा निर्णय असून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
“सरकारने अद्याप जनगणना कधी करणार? याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, जातीय जनगणना करणे शक्य नाही. यामुळे केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी आणि दिशाभूल करणारी आहे,” असा आरोप त्यांनी केला.
2026 मध्ये होणाऱ्या परिसीमनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार हेतुपुरस्सर जनगणना लांबवत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. “जर जनगणनाच झाली नाही, तर जातीय जनगणना कशी होणार? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच घडलेल्या हिंसक घटनेचा संदर्भ देत त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला. “या घटनेमुळे देशभरात आक्रोश निर्माण झाला आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच केंद्र सरकारने जातीय जनगणनेचा हा निर्णय घेतला का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.