प्रतिनिधी.
कल्याण – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे आज कल्याणात पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. भाजप कल्याण जिल्ह्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार सरनाईक यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
ईडीकडून सुरू असणाऱ्या कार्यवाहीबाबत प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया देताना नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबाबत हे वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ कल्याणात भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांतर्फे प्रताप सरनाईक हाय हाय, आघाडी सरकार हाय हाय अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
प्रताप सरनाईक यांच्यासारखे लोकप्रतिनिधी निवडून जाणे हे संपूर्ण महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. तानाजी मालुसरे यांच्यासारख्या शूरवीराबाबत सरनाईक यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत निंदनीय असून त्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे हे आंदोलन छेडण्यात आल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिली.
दरम्यान यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



