DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत त्या पद्धतीने सर्वच पक्ष हे निवडणुकीसाठी सज्ज होतांना दिसत आहेत. त्यात केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थेवरही आपला झेंडा फडकविण्यासाठी भाजप सज्ज झाल्याचे दिसत आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीच्या तयारी साठी भाजप दंड थोपटून उभा असल्याचे चित्र दिसत आहे.आशातच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लागलेले विकासाचे ग्रहण दूर करण्यासाठी इकडे भाजपचा महापौर असणे आवश्यक आहे असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कल्याणात व्यक्त केले. कल्याणातील दिग्गज सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांच्यासह अनेक इतर पक्षाच्या भाजप पक्षप्रवेशानिमित्त झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचा झंजावात सुरू असून अनेक पक्षांतील पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर कल्याणचा हा संपूर्ण परिसर आपल्याला भाजपमय करायचा असून त्यासाठी आपण सर्वांनी संघटनात्मकदृष्ट्या एकत्रित काम करण्याचे आवाहनही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी यावेळी केले.दरम्यान सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब आदी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील महाजनवाडी सभागृहात हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.
कल्याणच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात जतिन प्रजापती हे एक मोठे नाव असून गेल्या दोन दशकांपासून त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच प्रजापती यांनी 2010 आणि 2015 मध्ये स्वबळावर अपक्ष म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र अवघ्या काही मतांच्या फरकाने त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.परंतू त्यानंतरही खचून न जाता त्यांनी अस्तित्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले. परिणामी त्यांचे हे सामाजिक काम, पाठीशी असलेली तरुणांची मोठी फौज आणि शहरात असलेला प्रचंड जनसंपर्क पाहता भाजपकडून त्यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. त्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आणि अखेर आज जतिन प्रजापती यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला.
या वेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार सुलभा गायकवाड, प्रदेश महिला आघाडी सचिव प्रिया शर्मा, जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी शहराध्यक्ष वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, मंडल अध्यक्ष रितेश फडके, स्वप्निल काठे, अमित धाक्रस,अनेक मान्यवर व्यक्ती, व्यापारी संघटना, महिला वर्ग उपस्थित होते.