नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – भविष्य सांगण्याचा बहाणा करून महिलेचे दागिने लांबविणाऱ्या भोंदूबाबाला पकडण्यात देवपूर पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे देवपूर पोलिसांनी भोंदुबाबाच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या भोंदूबाबा विरोधात जळगांव जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत.
देवपूर परिसरात राहणाऱ्या किरण जडे यांच्याकडे एक भोंदूबाबा साधूच्या वेशात आला होता. त्याने हातचलाखी करत जडे कुटुंबियांना महादेवाची पिंड आणि विभूती काढून दिली. तसेच तुमचे सोने द्या, मंत्रवून पुन्हा सायंकाळी देतो; अशी बतावणी केली. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने त्याच्याकडे सोन्याचे तीन ग्राम वजनाचे कानातील टॉप्स व सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असे एकूण १८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने दिले. परंतू भोंदूबाबा सायंकाळी परतलाच नाही. त्यामुळे किरण जडे यांनी देवपूर पोलिसांत फिर्याद दिली होती.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना परिसरातील सीसीटिव्ही फुटेज खंगाळण्यात आले. यात देवपूर भागातील बिलाडी रोडवरील एकता नगर परिसरात वरील क्रमांकाच्या दुचाकीवर एक इसम फिरत असल्याचे निदर्शनास आले. देवपूर पोलिस स्टेशनच्या शोध पथकाने तात्काळ त्यास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवित चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे नाव नारायण किसन चव्हाण, (३५) रा. ओझर खुर्द, ता. जामनेर, जि. जळगाव असे असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व दागिने असा ६८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल देवपूर पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केला. अधिक माहिती घेतली असता त्याचे विरुद्ध जामनेर जि. जळगाव येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, एएसपी.एस ऋषिकेश रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीष घोटेकर व त्यांचे डीबी पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार पंकज चव्हाण, पोना विश्वनाथ शिरसाठ, पोकाँ किरण सावळे, सागर थाटसिंगारे, सौरभ कुटे यांनी केली.