नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
ठाणे/प्रतिनिधी- दिवाळी सण म्हटला की,मोठी आर्थिक उलाढाल होत असते. बाजारात खूप गर्दी असते. रस्तोरस्ती दुकानांमध्ये सर्वत्र सेल लागलेले असतात. ठाण्यात देखील एक सेल लागला आहे. या सेलमध्ये कैद्यांनी बनविलेल्या वस्तु विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृहात दीपावली सणानिमित्त हा सेल लागला आहे. या सेलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तू याच कारागृहात गुन्ह्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या कैदांच्या कौशल्यातून निर्माण झाल्या आहेत.
ठाणे कारागृहातील या दीपावली सेलचे उद्घाटन ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले.कारागृहातील कैदांच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच शासन व प्रशासन म्हणून त्यांच्या पाठिशी उभे आहोत, किंबहुना हे कैदी शिक्षा भोगून समाजात जेव्हा पुन्हा परततील तेव्हा त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.



