DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रमोद तांबे – कल्याण म्हारळ येथील सर्वे नंबर 211 आणि गट नंबर २/५ मधील जमिनीवर विकासक महेश भरकलाल मट्टा यांच्या कडून सुरू असलेले उत्खनन कार्य हे शासनाच्या परवानगीशिवाय व नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप ऍडव्होकेट प्रकाश साळवे यांच्या कडून करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक तलाठी आणि संबंधित ग्राम अधिकाऱ्यांच्या संगम मताने हा भ्रष्टाचार झाला आहे असा गंभीर आरोप साळवे यांनी केला.
सदर प्रकरणात माहिती अधिकार कायद्यान्वये शासनाला उत्खनन परवाना, स्वामित्वधनाच्या पावत्या आणि स्थळ पाहणी अहवाल मागविण्यात आला होता. मात्र, यामध्ये अनेक विसंगती आढळून आल्या. तलाठी यांनी एकाच भूखंडावर तीन वेगवेगळ्या पंचनाम्याद्वारे तिन वेळा वेगवेगळे अहवाल सादर केले असून, काही पंचनामे तर प्रत्यक्ष स्थळ पाहणीशिवायच तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, 23 एप्रिल 2025 रोजीचा 300 ब्रास उत्खननाचा पंचनामा प्रत्यक्ष पाहणी न करता दिला गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, 2 जून 2025 रोजीच्या अहवालात 3000 ब्रास उत्खनन दिसून येत असूनही, विकासकाने केवळ 200 ब्रास महसूलाचे स्वामित्वधन भरले असल्याचे नोंद आहे. यावरून विकासकाच्या फायद्यासाठी प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून शासनाचा महसूल बुडविल्याचा संशय आहे.गंभीर बाब म्हणजे 25 जून 2025 रोजीच्या पंचनाम्यात तलाठी यांनी 1162 ब्रास उत्खनन झाल्याचा उल्लेख केला आहे. या सर्व प्रकारातून तलाठी व संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी विकासकाला संरक्षण देत शासनाची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे.
तक्रारदाराने संपूर्ण कागदपत्रे जोडून तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. तसेच, महसूल मंत्री यांनी विकासकावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत तत्काळ बांधकाम परवाना रद्द करण्यात यावा आणि सुरू असलेले बांधकाम थांबवण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तक्रारदार प्रकाश साळवे यांनी इशारा दिला आहे की, जर योग्य ती कारवाई झाली नाही तर दिनांक 28 जुलै 2025 रोजी संबंधित महसूल कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. या प्रकरणाने आता गावात खळबळ उडवली असून, महसूल विभागाने तत्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी ऍडव्होकेट प्रकाश साळवे यांनी मागणी केली आहे.
या प्रकरणात महसूल कार्यालयाशी संपर्क केला असता मंडळ अधिकारी प्रीती घुडे यांनी सांगितले की यात फेर तपासणीचे आदेश तहसिलदार यांनी दिले आहेत जर काही गैर यात घडले असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल