DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – भारतीय डाक विभागाने उत्कृष्टता आणि राष्ट्र उभारणीच्या दिशेने सज्ज होण्यासाठी त्यांच्या पुढील पिढीतील प्रगत पोस्टल टेक्नॉलॉजी (एपीटी) प्रणालीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली असून संपूर्ण महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात ०४ ऑगस्ट २०२५ रोजी हि प्रणाली लागू होत आहे. या परिवर्तनकरी उपक्रमाचा भाग म्हणून कल्याण आणि डोंबिवली (यामध्ये कल्याण मुख्य डाक घर ऑफिससह , तसेच अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये ०४ ऑगस्ट २०२५ रोजी हि अपग्रेड केलेली प्रणाली लागू होणार आहे. या प्रगत यंत्रणा सक्षम करण्यासाठी दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ (शनिवार) रोजी नियोजित डाऊन टाइम घेण्यात येणार आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस मध्ये कोणतेही व्यवहार केले जाणार नाहीत. डेटा मायग्रेशन, सिस्टम व्हेलीडेशन आणि कॉन्फिगरेशन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, नवीन सिस्टम सुरळीत आणि कार्यक्षमतेने सुरु होईल याची खात्री करण्यासाठी हे तात्पुरते निलंबन आवश्यक आहे.
“ टपाल विभाग पूर्वी खाजगी आयटी प्रदात्यावर अवलंबून होता आणि आता इन-हाऊस सिस्टीमकडे वळण्यामुळे अनेक फायदे होतील – ज्यामध्ये सुव्यवस्थित अकाउंटिंग, रिअल-टाइम सेटलमेंट, सुधारित ग्राहक संवाद आणि क्यूआर कोड-आधारित पेमेंटसाठी समर्थन यांचा समावेश आहे, जे जुन्या सेटअपमध्ये शक्य नव्हते. ग्राहक-केंद्रित सिस्टीम वापरकर्त्यांच्या फोनवर थेट रिअल-टाइम पार्सल ट्रॅकिंग अपडेट्स देखील पाठवेल, ज्यामुळे सेवा पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय झेप येईल. आम्ही आमच्या मौल्यवान ग्राहकांना विनंती करतो कि त्यांनी त्यांच्या भेटीचे आगाऊ नियोजन करावे आणि या छोट्या व्यत्ययादरम्यान आमच्यासोबत राहावे. सदर उपक्रमासाठी २ ऑगस्ट रोजीच्या नियोजित डाऊनटाइम साठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन नागेश खैरनार – पोस्टमास्टर, कल्याण सिटी हेड पोस्ट ऑफिस, कल्याण यांनी नागरिकांना केले आहे.