DESK MARATHI NEWS.
बिहार/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात सलग दुसऱ्या दिवशीही सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी आपल्या उपस्थितीची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून अॅड. आंबेडकर यांच्या सहभागामुळे या आंदोलनाला नवसंजीवनी मिळाल्याचे प्रतिपादन आंदोलकांनी केले.
बोधगया येथील ऐतिहासिक महाविहार अनेक दशकांपासून सरकारी नियंत्रणाखाली आहे. याविरोधात बौद्ध समाजाकडून विहार मुक्तीची मागणी होत असून देशभरातील बौद्ध अनुयायी यासाठी एकत्र आले आहेत.अॅड. आंबेडकर यांचा सलग दुसऱ्या दिवशीचा सहभाग आंदोलनकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बोधगया येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला भेट देऊन प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. यापूर्वी त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे वचन दिले होते, ते त्यांनी पाळले आहे. त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून बौद्ध समुदायाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समुदायाकडे सोपविण्यात यावे. बोधगया मंदिर कायदा, १९४९ रद्द करण्यात यावा. या मागण्यांच्या समर्थनार्थ १२ फेब्रुवारी २०२५ पासून बोधगया येथे बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू आहे.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने महाराष्ट्रभर स्वाक्षरी मोहिमा आयोजित करण्यात आल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर यांचा या आंदोलनातील सहभाग बौद्ध समुदायाच्या हक्कांसाठीच्या लढ्याला बळकटी देणारा ठरला आहे. या घटनाक्रमामुळे महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनावर बौद्ध समुदायाचा हक्क प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना नवे बळ मिळाले आहे.