नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर/प्रतिनिधी – एका 28 वर्षीय महिलेने नागपूर मनपाच्या समोर अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. नागपूर मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची परिसरात चर्चा आहे. मिळालेल्या माहिती नुसार पीडित महिला नंदनवन परिसरात तिच्या 2 मुलींसह राहते. ती केडीके कॉलेजसमोर अंडा भुर्जीचं दुकान लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. मिळालेल्या माहितीनुसार फुटपाथ वर दुकान लावल्यामुळे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तिच्या दुकानावर कारवाई करुन सामान जप्त करतात. मात्र, सामान परत मागण्यासाठी गेली असता तिला पूर्ण सामान परत केलं जात नाही.
यामुळे वारंवार होणाऱ्या अतिक्रमण कारवाईमुळे ती त्रस्त झाली होती. 4 दिवसाआधी देखील गुरुदेव नगर येथील झोन च्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण कारवाई करुन तिच्या दुकानाचा माल जप्त केला होता. मात्र, जप्त झालेलं सामान परत आणण्यासाठी मनपा झोन मध्ये गेली असता तिला अर्धचं सामान परत करण्यात आले. महिलेने सांगितले की, अधिकाऱ्यांनी तिला सामान भेटलं, ते तुझ भाग्य समज. काही लोकांना तर अर्ध सामान देखील परत मिळत नाही. असे बोलून अपमानित करुन बाहेर पाठवले. त्यामुळे ही महिला इतकी टोकाला गेली की, तीने बॉटलमध्ये आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले, घटनेच्या वेळी तिची 5 वर्षाची मुलगी देखील सोबत होती. पेट्रोल डोक्यावर टाकताच हे पेट्रोल तिच्या डोळ्यात आणि तोंडात गेल्याने ती बेभान झाली आणि तडफडत जमिनीवर कोसळली. या घटनेतील सत्यता पडताळून आपण संबंधित दोषींवर कारवाई करू अशी भूमिका मनपा आयुक्तांनी घेतली आहे.