कल्याण/प्रतिनिधी – कल्याणमधील शासकीय वस्तीगृहात मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा येथे गौरी अर्पांटमेंटमध्ये सामाजिक कल्याण विभागातर्फे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह चालविले जाते. या वस्तीगृहाच्या छताचा काही भाग काल रात्री कोसळला. त्याठिकाणी कार्यरत असलेले वॉर्डन रामचंद्र जाधव यांच्या डोक्यात हा छताचा भाग कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले.
वॉर्डन रामचंद्र जाधव यांची प्रकृती आता स्थिर आहे. परंतु त्यांना या दुर्घटनेत आपला एक डोळा गमवावा लागला आहे. अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. शासकीय वस्तीगृहात ही दुर्घटना घडली तेव्हा २३ विद्यार्थी घटनास्थळी उपस्थित होते. या धक्कादायक घटनेमुळे वसतिगृहात एकच खळबळ उडाली आहे.