सोलापूर/प्रतिनिधी – पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी अनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाला एक रोपटे देऊन त्याचे संगोपन करण्यास सांगितले जाते.रुग्णांना रोपटे वाटप करण्याचा उपक्रम अनगर येथील डॉ.संतोष गुजरे गेल्या 20 वर्षांपासून अविरतपणे राबवत आहेत.डॉ. गुजरे रुग्णसेवेइकेच पयावर्णाचे आरोग्य जपत असून अनगर व परिसरातील आजूबाजूच्या गावात त्यांनी आजपर्यंत 15 हजार रोपांचे वाटप केले असून त्यांनी अनेक झाडांची जपणूकही केली आहे.रुग्ण सेवेबरोबरच पर्यावरण संवर्धन करणारा डॉक्टर अशीही त्यांची परिसरात ख्याती आहे.
डॉ. संतोष गुजरे गेल्या 20 वर्षांपासून रुग्णांना रोपे वाटप करत असून त्यांनी अनेक झाडांचे स्व:ता संगोपनही केले आहे.डॉ. गुजरे यांचे अनगर ता.मोहोळ येथे हॉस्पिटल असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर येथे झाले आहे.अनगर येथील स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये दोघे पती-पत्नी रुग्णांना सेवा देण्याचे काम करतात.या हॉस्पिटलमध्ये नेहमीच रुग्णाची वर्दळ असते.अनगरसह परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील व आजूबाजूच्या गावचे रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येतात.रुग्णांना उपचारानंतर घरी जाताना रोपटे दिले जात असून त्याचे संगोपन करण्यास सांगितले जाते.हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे बहुसंख्यांक रुग्ण हे शेतकरी आहेत.त्यामुळे त्यांनी रोपांचे आपल्या शेतात चांगले संगोपन केले आहे.गेल्या 20 वर्षात अनेक झाडे मोठी झाली असून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येताना अनेक रुग्ण झाडाला आलेले फळे घेऊन येतात.आजही रुग्णांना रोपे वाटप केले जात असून या झाडे वाटपाच्या माध्यमातून पर्यावरण समतोल राखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. गुजरे यांनी सांगितले.
अनगर परिसरात बिटले,कुरणवाडी, खंडोबाची वाडी,पासलेवाडी,गलंदवाडी,नालबंदवाडी,वाफळे आदी 12 गावे येतात.डॉ. गुजरे यांनी अनगर गाव परिसरातील शाळा,कॉलेज,स्मशानभूमी,मंदिर परिसर व रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावली असून या कामात त्यांना त्यांचे सहकारी सचिन कदम,थिटे व त्यांचा स्टाफ यांची मोलाची मदत आहे.अनगर व बिटले गावात त्यांनी मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड केली असून दोन्ही गावचा परिसर हिरवळीने नटलेला आहे.त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक आहे.
- May 3, 2021



