नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
अकोला/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसला मोठा धक्का बसला आहे जो त्यांना पचायला अवघड जाणार आहे. कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव,राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत काल अकोल्यातल्या कृषीनगर भागातील आंबेडकरांच्या यशवंत नगर निवसस्थानी प्रवेश घेतला. यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण,जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे उपस्थितीत होते. उत्कर्षा रुपवते यांच्यासोबत सहकाऱ्यांनी देखील कॉँग्रेस ची साथ सोडली.
महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने उत्कर्षा रुपवते नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. पण आता त्यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला. उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होत्या. मात्र, मविआच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली. पक्षश्रेष्ठींकडे ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी उत्कर्षा रुपवते अनेक दिवसांपासून करत होत्या. गेली अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला डावलत असल्याचा आरोप करण्यात आला होता. रुपवतेंनी काही दिवसांपूर्वी मुंबईत आंबेडकरांची भेट घेतली होती.
उत्कर्षा रुपवते या काँग्रेसचे दिवंगत नेते,माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची नात तर दिवंगत नेत प्रेमानंद रुपवते यांच्या कन्या आहेत. तर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या त्या निकटवर्तीय आहेत. रुपवतेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने शिर्डीत काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.