DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षांत आपण हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली असून विद्यमान खासदारांनी गेल्या वर्षभरात इतकी विकासकामे केली असतील तर ती दाखवून द्यावी, आपण त्यांचा नागरी सत्कार करू अशा शब्दांत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी केलेल्या त्या दाव्याची खिल्ली उडवली.
खासदारकीच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी पाटील यांनी दहा वर्षांतील ठळक विकासकामांसोबतच कल्याण मेट्रो, सुभाष मैदान येथील प्रस्तावित इनडोअर स्टेडियम, नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील नामकरण, लोकसभा निवडणूक, भिवंडी – वाडा महामार्गाची दुरावस्था, मराठी – अमराठी वाद, केडीएमसी निवडणूक, स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण स्टेशन परिसरात रडत खडत चाललेले सॅटीसचे काम आदी महत्त्वाच्या विषयांवर पत्रकारांशी सखोल संवाद साधला.
एखादी व्यक्ती जर खरोखर विकास करत असेल तर ती कोणत्या पक्षाची आहे हे महत्त्वाचं नाहीये. जनतेच्या हिताचं काम जर कोणी खरंच करत असेल आणि ती कामं त्यांनी आपल्याला दाखवली तर आपण आपल्याला त्याबाबत कोणताही आकस असू नये. गेल्या दहा वर्षात आपण कमीत कमी 28 ते 29 हजार कोटीची विकासकामे मंजूर केली असून ही सर्व कामे सुरू असल्याचे आपल्याला दिसून येईल. आणि ते म्हणत आहेत की इतकी सर्व कामे आपण एका वर्षांत केली असे सांगत आहेत, तर आपणही त्यांना विचारले पाहिजे की तुम्ही केलेली दोन चार कामे तरी दाखवा असे सांगत कपिल पाटील यांनी नाव न घेता विद्यमान खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्यावर टीका केली.
भिवंडी शहरातील मेट्रोचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले असून कल्याणकडे येणारी मेट्रो ही तत्कालीन आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे रखडल्याची टीकाही पाटील यांनी यावेळी केली. भिवंडी आणि कल्याण या दोन्हीकडील बदललेल्या डीपीआरला मान्यता देण्याकडे आघाडी सरकारने साफ दुर्लक्ष केल्यानेच कल्याण मेट्रो रखडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दोन्ही डीपीआर मंजूर केले असून आता लवकरच या कल्याण मेट्रोच्या कामाला सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राजमाता जिजामाता यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नव्हे तर उभा महाराष्ट्र घडवण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदराचे, श्रद्धेचे स्थान आहे. मात्र एखादी ठेकेदार संस्था या जिजामाता यांचे नाव वापरून भ्रष्टाचार, बोगस काम करत असतील तर त्यांना हे नाव वापरू न देण्यासाठी राज्य सरकारने कार्यवाही केली पाहिजे असे सांगत कपिल पाटील यांनी जिजाऊ संघटना आणि या संस्थेचे प्रमूख निलेश सांबरे यांच्या कारभारावर नाव न घेता ताशेरे ओढले. बहुचर्चित भिवंडी – वाडा रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेकाना अपंगत्व आले आहे, अनेक सामाजिक संस्थांनी या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आंदोलनेही केली आहेत. तसेच या सर्व कारभाराबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून योग्य वेळी त्याची चौकशी सुरू होईल असा सूचक इशाराही कपिल पाटील यांनी यावेळी दिला.