नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय रेल्वेने गणेशोत्सव-2025 दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेवर सेवा देणाऱ्या गणपती विशेष गाड्यांच्या थांब्यांचे नियोजन कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, कामथे , सावर्डा , अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली रोड, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, मुकांबिका रोड, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या ठिकाणी करण्यात आले आहे.
नियमित रेल्वे सेवांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच गर्दीच्या हंगामात आणि सण, विशेष कार्यक्रम इत्यादींमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने वाहतुक, कार्यान्वयन व्यवहार्यता, संसाधनांची उपलब्धता इत्यादींच्या अधीन राहून रेल्वे विशेष गाड्या चालवते. विद्यमान सेवांमधील भार देखील अशा प्रकारे वाढवला जातो.
याशिवाय, सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी तसेच समाजविघातक घटकांकडून होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहेत. 01.07.2025 पासून रेल्वेच्या अधिकृत तिकीट एजंटना सुरुवातीच्या दिवशी पहिल्या तीस मिनिटांत वातानुकूलित (एसी) तसेच बिगर वातानुकूलित श्रेणीसाठी तात्काळ तिकिटे बुक करण्याची परवानगी नाही, म्हणजेच, त्यांना एसी क्लासेससाठी सकाळी 10:00 ते 10:30 आणि बिगर वातानुकूलित श्रेणीसाठी सकाळी 11:00 ते 11:30 पर्यंत सुरुवातीच्या दिवशी तत्काळ तिकिटे आरक्षित करण्याची परवानगी नाही.
रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) देखील तात्काळ आरक्षणाच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी काही पावले उचलली आहेत. सर्वप्रथम, रेल्वे तिकिटे खरेदी आणि पुरवठा करण्याच्या अनधिकृत व्यवसायात सहभागी असलेल्या व्यक्ती/एजन्सींविरुद्ध आरपीएफकडून नियमित मोहिमा राबवल्या जातात.
गुन्हेगारांवर रेल्वे कायद्याच्या कलम 143 अंतर्गत गुन्हे दाखल केले जातात. व्यापक परिणाम होऊ शकणाऱ्या प्रकरणांमध्ये तसेच इतर गुन्हेगारी घटकांचा समावेश असणाऱ्या प्रकरणांमध्ये पोलिस आणि सीबीआय सारख्या इतर कायदा अंमलबजावणी संस्थांशी समन्वय साधला जातो. स्क्रिप्टिंग सॉफ्टवेअरचा वापर करण्यासह अनधिकृत तिकीट विक्री क्रियाकलापांना प्रतिबंध करण्यासाठी आरपीएफ प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) केंद्रे, बुकिंग कार्यालये, फलाट, रेल्वे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी नियमित तपासणी केली जाते. सण, सुट्ट्या इत्यादी गर्दीच्या काळात अशा तपासण्या तीव्र केल्या जातात.
समाजविघातक घटकांकडून तिकिटे खरेदी करू नयेत किंवा या स्रोतांकडून तिकिटे खरेदी करण्याचे परिणाम काय असू शकतात, याविषयी सार्वजनिक संबोधन प्रणाली आणि माध्यमांद्वारे सामान्य नागरिकांनादेखील शिक्षित केले जाते.केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.