मुंबई/प्रतिनिधी – महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), मुंबई झोनल युनिटने देशात परदेशी बनावटीच्या सिगारेटची तस्करी करण्याचा एक मोठा प्रयत्न उधळून लावला. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी न्हावा शेवा बंदरात माल पकडला. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या कंटेनरमध्ये टॉप गन (TOP GUN ) ब्रँडच्या सिगारेटचे 1,014 डबे होते. यात सिगारेटच्या 1,01,40,000 काड्या होत्या, ज्याची किंमत 13.18 कोटी रुपये इतकी आहे.
सिगारेटची आयात करताना तस्करांनी माल कायदेशीर असल्याचे दाखवून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी हा माल ‘कोटेड कॅल्शियम कार्बोनेट’ म्हणून घोषित केला होता. या प्रकरणी डीआरआय च्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही आयात 26 मार्च 2018 रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिसूचने द्वारे सुधारणा करण्यात आलेला सीमाशुल्क कायदा, 1962 आणि सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने (पॅकेजिंग आणि लेबलिंग) नियम, 2008 चे स्पष्ट उल्लंघन करणारी आहे.
परदेशी बनावटीच्या सिगारेटच्या तस्करीमुळे सरकारचे मोठे महसुली नुकसान तर होतेच, शिवाय देशांतर्गत तंबाखू उद्योगातील निरोगी स्पर्धाही बिघडते, तसेच सार्वजनिक आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होतो. या बेकायदेशीर सिगारेट अनेकदा आरोग्य आणि सुरक्षा विषयक नियमांचे कायदेशीर पालन टाळतात, ज्यामध्ये COTPA कायद्यांतर्गत अनिवार्य नियमांचा समावेश आहे, जसे की चित्रमय इशारे आणि सामग्री उघड करणे. परिणामी, ग्राहक- विशेषत: तरुण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट – अनियंत्रित आणि संभाव्यत: अधिक हानिकारक उत्पादनांच्या संपर्कात येतात.अशा तस्करीचा सामना करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेला हानी पोहोचवणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांना रोखण्यासाठी डीआरआय वचनबद्ध आहे.असे डीआरआय कडून स्पष्ट करण्यात आले आहे