DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने अंबरनाथमध्ये वीज ग्राहकांच्या समस्यांसाठी आयोजित शिबीरात ३० तक्रारींचे निवारण करण्यात आले. महावितरणच्या अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम उपविभागातील ग्राहकांसाठी शुक्रवारी (०९ मे) या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
२८ एप्रिल ते १२ मे दरम्यान सेवा हक्क पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या प्रलंबित असलेल्या विशेषत: नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या वीज बिलावरील नावात बदल तसचे विविध प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार अंबरनाथमध्ये ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शुक्रवारी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात नवीन वीजजोडणीचे १०, वीज बिलावरील नावात बदल करण्याबाबतचे ८ आणि वीज बिलासंदर्भातील १२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा व उल्हासनगर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले. अंबरनाथ पूर्व व पश्चिम उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनुक्रमे जितेंद्र प्रजापती आणि अलका कावळे यांच्या नेतृत्वाखाली अभियंते, कर्मचाऱ्यांनी हे शिबीर यशस्वी केले.