महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
न्युजरूम शिक्षण

श्री गजानन विद्यालयात पार पडला माजी विद्यार्थ्यांचा मनोमिलन मेळावा

DESK MARATHI NEWS.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे- कल्याण मधील श्री गजानन विद्यालय आणि शिशुविहार शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा आणि  शिक्षकांचा भव्य मनोमीलन मेळावा अत्यंत भावनिक वातावरणात मोठ्या उत्साहात रविवारी पार पडला. या सोहळ्याचे केंद्रस्थान ठरल्या ते शाळेच्या संस्थापिका प्रतिभा भालेराव म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांच्या लाडक्या मोठ्या बाई, ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने शाळेचा पाया मजबूत झाला आणि शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले.

सर्व विद्यार्थ्यांना पाहून मोठ्या बाईंनी गहिवरून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीला साधनसंपत्तीच्या अभावात सुरू झालेल्या शाळेच्या प्रवासाचा त्यांनी भावुकतेने आढावा घेतला. तेव्हा बसायलाही खुर्च्या नव्हत्या, परंतु पालकांच्या प्रेमाने आणि सहकार्याने शाळेची उभारणी झाली. विद्यार्थ्यांवर प्रेमाने शिस्त लावत त्यांना घडवले आणि आज त्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत नाव कमावले आहे, याचा बाईंना अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले.

या मेळाव्याची सुरवात सकाळी ९ वाजता नाव नोंदणी, प्रवेशाने आणि सनईच्या मधुर स्वरात झाली. नंतर शाळेची घंटा वाजवून आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ झाला. प्रमुख मान्यवरांचे कोमल विसपुते यादव,  अजय भिडे आणि रूपाली मोरे यांनी स्टेजवर स्वागत केले. यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २७ हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अजय भिडे यांच्या प्रास्ताविकानंतर माजी विद्यार्थी व शाळा समिती सदस्य केदार पोंक्षे आणि डॉ. अभिजीत ठाकूर यांनी आपल्या शाळेच्या आठवणी सांगत कृतज्ञता व्यक्त केली.

शाळेच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचललेल्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव आणि कल्पना पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर मोठ्या बाईंच्या जीवनकार्याचा गौरव करणाऱ्या मानपत्राचे  वाचन करण्यात आले आणि ८८ दिव्यांनी औक्षण करून त्यांचा भावपूर्ण सन्मान करण्यात आला. त्यानंतर स्टेजवरील मान्यवर शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना सन्मानचिन्ह प्रदान करून आपल्या ऋणानुबंधांची जाणीव करून दिली. नंतर काही माजी विद्यार्थ्यांनी आपले भावस्पर्शी अनुभव सांगून वातावरण अधिकच गहिवरवले.

यावेळी विशेष आकर्षण ठरली मनिष बोरसे यांनी सादर केलेली चित्रफीत, ज्यात शाळेच्या प्रवासातील सोनेरी क्षण टिपले होते. बालपणातील गोड आठवणी सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणाऱ्या ठरल्या. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मोठ्या बाईंनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेप्रतीची निस्सीम निष्ठा आणि प्रेम व्यक्त केले. “शाळा, विद्यार्थी आणि पालक हेच माझं आयुष्य आहे,” असे सांगताना त्या भरून आल्या. कार्यक्रमाचा समारोप सुधीर कुलकर्णी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. ‘वंदे मातरम्’च्या घोषात शाळेची घंटा वाजवून कार्यक्रमाची सांगता झाली. यानंतर सर्व उपस्थितांनी रुचकर भोजनाचा आनंद घेतला आणि एकत्र येत पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×