DESK MARATHI NEWS ONLINE.
कल्याण/प्रतिनिधी – केडीएमसीला लागलेले लाचखोरीचे ग्रहण सुटण्याचे चिन्हच दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केडीमसीचे आतापर्यंतअनेक कर्मचारी लाचखोरी प्रकरणात सापडले असून बुधवारी लाचखोरी प्रकरणी आणखीन एक लिपिक लाच घेताना रंगेहात जाळ्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील आय प्रभाग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले लिपिक संतोष पाटणे याला बुधवारी ठाणे लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून दीड हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आय प्रभागात एका नागरिकांनी मॅरेज सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्ज केला होता. सदर दाखला तात्काळ मिळावा यासाठी त्यांनी महापालिकेच्या आय प्रभागातील नागरिक सुविधा केंद्रामध्ये अर्ज केला होता. तो अर्ज तात्काळ हवा असल्यास पाटणे यांनी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत सदर नागरिकांनी ठाणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ठाणे लाच लुचपत विभागाने या तक्रारीची पडताळणी करून सापळा लावला. आणि त्या सापळ्यात खाबुगिरी करणारा लिपिक अडकला.
दुपारी महापालिका कर्मचारी पाटणे यांनी सदर नागरिकाकडून तत्काळ मॅरेज सर्टिफिकेट देण्यासाठी 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती मात्र तडजोड केल्यानंतर दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून पुनः एकदा केडीएमसीच्या बाबूंची खाबुगिरी समोर आली आहे. प्रशासन हे नागरिकांच्या सुलभ सेवेसाठी तत्पर असले पाहिजे पण सरकारी बाबूंच्या खाबुगिरी मुळे त्याला गालबोट लागल्याचे समोर येत आहे.