DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवर काम करणाऱ्या कचरावेचक कुटुंबातील 5 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत मुख्य प्रवाहाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. गौरी सोनवणे (63 टक्के), श्रद्धा सोनवणे (65 टक्के), अर्चना घुले (51टक्के), कुणाल उकांडे (60 टक्के) आणि दीपक जगताप (46 टक्के) अशी या पाच विद्यार्थ्यांची नावे आहेत. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या एक दशकांहून अधिक काळ मेहनत घेणाऱ्या अनुबंध संस्थेशी हे विद्यार्थी जोडले गेले आहेत.
पूर्वापार चालत आलेली घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती. शिक्षण तर दूर साधे एकवेळचे जेवणही मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष अशी भयानक परिस्थिती असतानाही या मुलांनी मिळवलेले हे गुण म्हणजे 100 टक्क्यांहून अधिक सरसच. एकीकडे आपण समाजात पाहतो की आपल्या मुलासाठी आई वडील काय हवं, काय नको, चांगली शाळा, चांगला क्लास असं सगळं काही देण्याचा प्रयत्न करतात.
तर दुसरीकडे या कचरावेचक मुलांच्या घरची एकदम त्याउलट परिस्थिती. मुलाला काही तरी देण्याची इच्छा असूनही पोटाच्या भुकेपुढे आपल्या पोटच्या गोळ्याकडे त्यांना नाईलजातव दुर्लक्ष करावं लागतं. मात्र या गोष्टीचं कोणतेही भांडवल न करता या पाच विद्यार्थ्यांनी जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर आज हे यश प्राप्त केलं आहे.
मुख्य प्रवाहात येण्यासाठी, मुख्य प्रवाहात जोडलं जाण्यासाठी त्यांचे हे पहिलेच पाऊल. त्याबद्दल गौरी सोनवणे (63 टक्के), श्रद्धा सोनवणे (65 टक्के), अर्चना घुले (51टक्के), कुणाल उकांडे (60 टक्के) आणि दीपक जगताप (46 टक्के) या पाचही जणांचे करावे तितके कौतुक कमीच ठरेल. या पाचही जणांच्या जिद्दीला आणि त्यांच्या मनामध्ये ही जिद्द निर्माण करणाऱ्या अनुबंध संस्थेला मनापासून सलाम.
