नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
रत्नागिरी/प्रतिनिधी – रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील मतदारसंघांत यावेळी कोणाच्या बाजूने कौल लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे. रत्नागिरीची जनता परत खासदार विनायक राऊत यांच्यावर विश्वास टाकणार की नारायण राणे यांना निवडणार. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सिंधुदुर्ग मधून महायुतीकडून नारायण राणे तर उद्धव बाळासाहेब गटातील खासदार विनायक राऊत हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. प्रचारादरम्यान जनतेशी संवाद साधताना विनायक राऊत यांनी विरोधकावर टीकेची तोफ डागली ते म्हणाले “विनायक राऊत मंत्री पदासाठी हपापलेला नाही. माझी पक्षासाठी निष्ठा कायम आहे. नारायण राणे यांनी मंत्री म्हणून काय दिवे लावले आहेत ? मंत्री म्हणून काही केलेले नाही आता काय करणार” अशी जहरी टीका खासदार विनायक राऊत यांनी आपल्या विरोधकांवर केली.
पत्रकारांशी संवाद साधताना खासदार विनायक राऊत म्हणाले “रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष माझ्या बाजूने आहेत. उद्धव ठाकरे यांची 28 एप्रिलला रत्नागिरी सभा होईल. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या रूपाने विजयाचा पहिला पुकार ते देतील. 3 मे ला कणकवलीच्या सभेमध्ये ते माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करतील.” असे ते म्हणाले. तसेच महायुतीबद्दल बोलताना ते म्हणाले कि “या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील गद्दारांचे सरकार पूर्णपणे बरखास्त होईल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल. पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाला बाहेर फेकले जाईल. अजित पवारांना सुद्धा कार्यकक्षा बाहेर फेकले जाईल” त्यांनी आपल्या विरोधकांवर हल्ला केला.
“मनसेची रत्नागिरीत सभा होऊ देत. मोर नाचतो म्हणून तुडतुडं देखील नाचत आहे. कोणाची तळी उचलत आहे याचे भान ठेवा. मुंबई गुजरातला जोडायचा षडयंत्र सुरू आहे. गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबाण संपवण्याचे काम सुरू आहे. कपटी लोकांसाठी मनसे जर पुढे येत असेल तर जनता त्यांची जागा त्यांना दाखवून देईल.”मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला पाठींबा देत असल्याची घोषणा केली. त्यावर विनायक राऊत यांनी जहरी टिका केली.