नेशन न्युज मराठी टिम.
कल्याण- पु ल कट्टा- वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती, कल्याण आणि सार्वजनिक वाचनालय, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित, वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे स्पर्धक, मान्यवर आणि रसिकांच्या प्रचंड प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडली.
पारितोषिक वितरण सोहळा, ऋजु व्यक्तित्व, कवी डॉ अनुपमा उजगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सार्वजनिक वाचनालय कल्याणचे अध्यक्ष यांच्या वतीने सहाय्यक ग्रंथपाल करुणा कल्याणकर, स्पर्धा परीक्षक कवी छाया कोरेगावकर आणि शशी डंभारे काव्यमंचावर उपस्थित होत्या. स्वागताध्यक्ष आमदार विश्वनाथ भोईर यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कवी ज्योती हनुमंत भारती यांनी यथार्थ आणि समर्पक सूत्रसंचालन करीत सोहळा रंगतदार केला. महिला विशेष काव्यवाचन स्पर्धेला एकूण ४७ कवींनी हजेरी लावली होती. परीक्षकांनी एकमताने विजेत्यांची निवड केली.
प्रथम पुरस्कार विजेत्या पुष्पांजली कर्वे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम १५००, द्वितीय पुरस्कार विजेत्या जयश्री रामटेके यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख एक हजार रुपये, तृतीय पुरस्कार अनिता कांबळे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख ५०० रुपये तर उत्तेजनार्थ पारितोषिक वीणा शिखरे, कल्पना सोमनाचे, उज्ज्वला लुकतुके, वर्षा शेट्ये, मेघना पाटील, पुजा काळे, स्वप्नाली कुलकर्णी, मनीषा मेश्राम, शुभांगी रेवतकर, पूनम सुनंदा यांना देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, समिती अध्यक्ष- किरण येले, कार्याध्यक्ष- प्रा प्रशांत मोरे, उपाध्यक्ष- भिकू बारस्कर, महेंद्र भावसार, समन्वयक- डॉ गिरीश लटके, कोषाध्यक्ष- संजय वाजपेई, सचिव- सुधीर चित्ते, सदस्य- किशोर खराटे, अर्जुन डोमाडे, साक्षी डोळस, सुधाकर वसईकर, दत्ता केंबुळकर, दामू काबरा, राज लाड आणि सार्वजनिक वाचनालयाच्या कर्मचारीवृंद यांनी प्रचंड मेहनत घेतली.