मुंबई :-राज्यातील महिला अत्याचारांच्या घटना व बालकांची सुरक्षितता याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी असे आदेश त्यांनी गृहविभागास दिले आहेत.
महिला व बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून यात टाळाटाळ करणाऱ्यांना माफी नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस यंत्रणेतील कोणतीही व्यक्ती, मग ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी जे या कामात टाळाटाळ करतील किंवा विलंब लावतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
घडलेल्या गुन्ह्यांचा एफआयआर तत्काळ नोंदवणे, लवकरात लवकर तपास सुरु करणे, गुन्हा सिद्धतेसाठी आवश्यक असलेल्या पुराव्यांचे संकलन करणे, न्यायालयात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करणे, परिपूर्ण पुराव्यांसह या केसेस न्यायालयात अभ्यासपूर्ण रितीने मांडणे या सगळ्या गोष्टींबाबत शासन महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून त्यादृष्टीने त्यांना आवश्यक असलेले कायदेविषयक संरक्षण आणि सहकार्य पुरवणार आहे. यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणेला अधिक सजग आणि दक्ष पणे काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
- February 7, 2020