नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परिसरात पडणारा पाऊस हा त्या भागातील शेतकरी व सामान्य नागरिकासाठी वरदान ठरत आहे. खरीप हंगामातील बियाणे पेरून निदान जमिन ओली व्हावी अशी आस लावून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो. पावसाने हजेरी लावल्यास उपासमारीची वेळ येणार नाही म्हणून तो अजून कष्ट करून निसर्गाचे आभार मानतो. अशी परिस्थिती असलेल्या जालन्यात ढगांच्या गडगडाटासह दमदार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात हवामान विभागाने 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान येलो अलर्ट जारी करत जोरदार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज पुन्हा एकदा ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने जालना शहरासह परिसरात हजेरी लावली आहे.
जालन्यासह घनसावंगी,अंबड परिसरात जोरदार पाऊस झाला असून बदनापूर तालुक्यात तब्बल तीन तास जोरदार पाऊस झाल्याची प्राथमिक माहिती आहे.तर रवना पराडा भागात सय्यद अलाऊद्दीन दर्गा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने दर्गा परिसरात नदी-नाले एक होऊन पाणी वाहत आहेत. जिल्ह्यात शनिवारी सकाळ पासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते त्यानंतर सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होण्यास मदत होणार असल्याने शेतकरी राजा सुखावलाय. आता असच पाऊस पुढेही व्हावा अशी आशा आता परिसरातील शेतकरी वर्ग करतो.