नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी -पोटफुगीच्या त्रासाने त्रस्त असलेल्या एका 47 वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल 11 किलोंची गाठ डॉक्टरांनी काढून तिला नवे जीवनदान दिले आहे. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. सदर गाठ ही गर्भाशयाच्या कर्करोगाची असल्याचे शस्त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील 47 वर्षीय महिला एक वर्षापासून पोटफुगीच्या त्रासाने त्रस्त होती; परंतु सुरुवातीला या पोटफुगीचा त्रास नसल्याने तिने पोटफुगीकडे दुर्लक्ष केले. परंतु काही दिवसांपूर्वी तिला श्वास घ्यायला होणारा त्रास, पाळीमध्ये अनियमितता तसेच तिचे जेवणही बंद झाल्याने ती शनिवारी सुपर स्पेशालिटी येथे उपचारासाठी दाखल झाली होती. यावेळी डॉक्टरांनी महिलेचा सिटीस्कॅन केला असता तिच्या पोटामध्ये गोळा असल्याचे निदान झाले.
यानंतर त्यामुळे महिलेचे प्राण वाचविण्यासाठी तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी या महिलेच्या पोटातील गाठ ही छातीपर्यंत वाढली होती. तसेच तिच्या आतड्यांनाही या गाठ चिपकून होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुतीची आणि किचकट होती. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे या महिलेच्या पोटातील तब्बल 11 किलोंची गाठ बाहेर काढण्यात त्यांना यश आले. डॉक्टरांनी सदर गाठ ही गर्भाशयाच्या कर्करोगाची असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
ही शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, आरएमओ डॉ. हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोगतज्ज्ञ डॉ. भावना सोनटके, स्त्रीरोगतज्ज्ञ सुषमा शिंदे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. नंदिनी देशपांडे यांनी यशस्वी केली.